लाचखोरी प्रकरणात मनपाच्या सफाई निरीक्षकाला दुहेरी शिक्षा!

– सफाई कर्मचाऱ्याचा पगार काढण्यासाठी चार हजारांची लाच; तीन हजार स्वीकारल्याचे न्यायालयात सिद्ध — चार वर्षांचा सश्रम कारावास

The Exposer
नागपूर : सफाई कर्मचाऱ्याचा पगार काढून देण्यासाठी लाच मागणे नागपूर महानगरपालिकेच्या सफाई निरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ श्री. एस. एच. ग्वालानी यांनी मनपाच्या प्रभाग क्रमांक ३२ मधील सफाई निरीक्षक खिलावन गणू राम लांजेवार याला दोषी ठरवत एकूण चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निकालामुळे लाचखोरी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पगारासाठी मागितली चार हजारांची लाच

ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एका सफाई कर्मचाऱ्याची कामावर गैरहजेरी होती. तिचा पगार काढून देण्यासाठी आरोपी सफाई निरीक्षकाने तक्रारदार महिलेकडे चार हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित महिलेने सन २०१५ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर एसीबीने कारवाई केली. यावेळी आरोपीने मागितलेल्या चार हजार रुपयांपैकी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत समोर आले.

पाच साक्षीदारांची साक्ष ठरली निर्णायक

या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर खटला न्यायालयात चालविण्यात आला. शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अभय जिकार यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. खटल्यात फिर्यादी, पंच साक्षीदार, तपास अधिकारी आणि सक्षम अधिकारी यांच्यासह एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबानी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे मान्य केले.

दोन कलमांतर्गत शिक्षा

न्यायालयाने आरोपी खिलावन लांजेवार याला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

तसेच कलम १३(१)(ड) अन्वये चार वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे.
लाच घेऊन शासकीय काम करून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याला न्यायालयाने सुनावलेली ही शिक्षा प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईला बळ देणारी ठरली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More