– शिक्षक, समाजप्रबोधक आणि हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असलेल्या लोकप्रिय ‘कराळे मास्तरां’वरील कारवाईने महाराष्ट्रात चर्चेला उधाण
The Exposer
वर्धा/नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात ‘कराळे मास्तर’ म्हणून लोकप्रिय असलेल्या शिक्षकावर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झाल्याने समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात तसेच त्यांच्या समर्थक आणि अनुयायांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित एफआयआरमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(1)(r), 3(1)(s) तसेच भारतीय न्याय संहितेतील अन्य कलमांचा समावेश असल्याचे उपलब्ध दस्तऐवजांत नमूद आहे.
‘कराळे मास्तर’ यांनी आजवर तळागाळातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून विविध शासकीय सेवांमध्ये स्थान मिळविले असून, आज ते शासकीय नोकऱ्यांमध्ये कार्यरत असल्याचेही निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते.शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याबरोबरच सामाजिक, राजकीय प्रश्नांवर स्पष्ट आणि परखड भूमिका मांडणे, ही त्यांची वेगळी ओळख बनली आहे.
छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असून, याच समतावादी विचारधारेतून ते कार्य करीत असल्याचे त्यांच्या समर्थकांसह निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. यूट्यूबच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रश्नांवर भाष्य करीत जनजागृती करणारे व्हिडीओ तयार करून ते सातत्याने सक्रिय असतात. त्यांच्या व्हिडीओतील स्पष्ट, थेट आणि परखड भाषाशैलीमुळे ते अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहेत.
विशेष म्हणजे, व्हिडीओ तयार करताना ‘कराळे मास्तर’ यांची एक स्वतंत्र आणि विशिष्ट मराठी भाषाशैली असते. त्यांची बोलण्याची पद्धत, शब्दांची मांडणी आणि परखड अभिव्यक्ती ही त्यांच्या व्हिडीओची वेगळी ओळख मानली जाते. त्यांची ही शैली कुणाला आवडो अथवा न आवडो, मात्र ते सातत्याने आपल्या नेहमीच्या शैलीतच यूट्यूबवर व्हिडीओ तयार करून भाष्य करीत असतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
मात्र, संबंधित प्रकरणातील व्हिडीओ आणि त्यातील वक्तव्यांवरून फिर्याद दाखल झाल्यानंतर झालेल्या पोलिस कारवाईमुळे समर्थकांना धक्का बसला आहॆ. कराळे मास्तर हे कोणत्याही जातीविरोधात द्वेष निर्माण करण्याच्या मानसिकतेचे नसून, समाजातील चुकीच्या प्रवृत्ती, अंधश्रद्धा आणि सामाजिक विसंगतींवर कठोर शब्दांत भाष्य करणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग असल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात येत आहे. राज्यात विविध जाती-धर्मांतील मोठा अनुयायी वर्ग त्यांच्याशी जोडलेला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेनंतर समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
“समाजात सुधारणा व्हावी, जागृती निर्माण व्हावी, विशेषतः युवा वर्ग सर्व दृष्टीने सक्षम आणि प्रगत व्हावा, देशाचा विकास मानवतावादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्हावा, समाजात समता प्रस्थापित व्हावी आणि बंधुभाव नांदावा, या उद्देशाने परखडपणे बोलणाऱ्या एका शिक्षकावर थेट ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन अटक होणे धक्कादायक आहे,” अशी भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा कायदेशीर भाग बघता फिर्यादीची बाजू आणि पोलिस तपास तितकाच महत्त्वाचा आहे. संबंधित व्हिडीओतील संपूर्ण आशय, वक्तव्यांचा संदर्भ, त्याचा कायदेशीर परिणाम तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रकरणाबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी पोलिसांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.
अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मर्यादा आणि कायद्याच्या चौकटीतील जबाबदारी
मात्र, ‘कराळे मास्तर’ म्हणून महाराष्ट्रभर परिचित असलेल्या शिक्षकावर झालेल्या या कारवाईने शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेच्या पुरोगामी वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. समाजप्रबोधनासाठी वापरली जाणारी परखड भाषा, शब्दाचे भान, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मर्यादा आणि कायद्याच्या चौकटीतील जबाबदारी, या तिन्ही मुद्द्यांवर यानिमित्ताने आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















