घरात कोणी नसल्याची संधी साधून घरफोडी; अवघ्या २४ तासांत आरोपीवर झडपवार! 

– ७० हजारांचा ऐवज जप्त, मौदा पोलिसांची कामगिरी

The Exposer
मोदा : घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडत अलमारीतील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, मोदा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या २४ तासांत घरफोडीचा छडा लावत आरोपीला अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

आरोपीकडून चोरीचा सुमारे २१ ग्रॅम सोन्याचा, अंदाजे ७० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी विशाल रामकृष्ण वासनिक, रा. माथणी, ता. मोदा यांनी मोदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दि. ३० ऑगस्टच्या रात्री घरात कोणीही नसताना अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील अलमारीत ठेवलेले सुमारे २१ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी मोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

घरफोडीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाला तातडीने तपासासाठी रवाना करण्यात आले. परिसरात अज्ञात आरोपीचा शोध सुरू असताना पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माथनी येतील आशय धर्मवीर वासनिक (वय १९ वर्षे) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

त्यानंतर आरोपीकडून चोरीचे २१ ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे ७० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या घरफोडीप्रकरणाचा पुढील तपास मोदा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी शशांत एन.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरीन दुर्गे यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक राहुल किटे, पोलीस अंमलदार संदीप कडू, गणेश मुदमाळी, रुपेश महादूले, शिवाजी दिंडे आदींचा सहभाग होता.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More