– वरोरा येथून रेल्वेने नागपुरात पोहोचला; ३ चोरीचे मोबाईलही जप्त
The Exposer
नागपूर : वरोरा येथून दोन Live Detonator घेऊन रेल्वेने नागपूर शहरात आलेल्या एका इसमाला लकडगंज पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीकडून तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले असून, BDDS पथकाच्या तपासणीत दोन्ही डिटोनेटर Live असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोपनीय माहितीच्या आधारे आजमशहा चौक परिसरात चोरीचे मोबाईल विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला पोलिसांनी पकडले. त्याने आपले नाव राजेंद्र रामलाल विश्वकर्मा (35), रा. बालोद, छत्तीसगड असे सांगितले. तो वरोरा येथील WCL कोळसा खाणीत कॉन्ट्रॅक्टरमार्फत मजूर म्हणून काम करीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पगाराचे पैसे न मिळाल्याच्या कारणावरून कॉन्ट्रॅक्टरचे मोबाईल चोरी केल्याची माहिती समोर आली. मात्र त्याच्याकडे दोन Live Detonator आढळल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. डिटोनेटर आरोपीकडे कसे आले, ते नागपूरपर्यंत आणण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता आणि त्यांचा वापर कशासाठी होणार होता, याचा सखोल तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह ATS नागपूरला याबाबत माहिती देण्यात आली असून आरोपीला अटक करून पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वाखाली लकडगंज पोलीस पथकाने केली.
Author: संतोष तायडे
संपादक















