– जादूटोण्याचा कथित प्रयोग; मांत्रिकास पोलिसांनी केली अटक
– स्मशानभूमीपासून थेट मृताच्या घरापर्यंत अंधश्रद्धेचा कथित खेळ
The Exposer
नागपूर : मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्याच दिवशी चितेच्या राखेवर पिवळ्या कापडाची बाहुली, लाल-पिवळे धागे, द्रवाने भरलेली बाटली आणि लिंबू ठेवून कथित अघोरी पूजा व जादूटोण्याचा प्रयोग केल्याच्या धक्कादायक प्रकाराने कुही तालुक्यात खळबळ उडाली आहे.
एवढ्यावरच न थांबता मृताच्या घरासमोरही संशयास्पद वस्तू ठेवण्यात आल्याने चांदेकर कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात कुही पोलिसांनी कथित मांत्रिक रामनरेश नथ्तू विश्वकर्मा (५८, रा. प्रधानमंत्री आवास योजना, भिलगाव) याला अटक केली आहे.
कुही तालुक्यातील साळवा येथील रहिवासी प्रशांत बाळू चाचेरकर (३१) यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबीयांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. मात्र, अंत्यविधीनंतर दुसऱ्याच दिवशी कुटुंबीय राख गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले असता चितेच्या राखेवर संशयास्पद वस्तू पडलेल्या दिसल्या.
राखेवर बाहुली, धागे, बाटली अन् लिंबू; दृश्य पाहून कुटुंबीय हादरले
चितेच्या राखेवर पिवळ्या कापडाची बाहुली, लाल-पिवळे धागे, द्रवाने भरलेली बाटली, लिंबू तसेच कापलेले लिंबू ठेवण्यात आल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. मृताच्या घरासमोरही कापलेले लिंबू ठेवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जादूटोण्याच्या भीतीने कुटुंबीय धास्तावले.
यानंतर प्रशांत चाचेरकर यांनी कुही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासातून आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस
स्मशानभूमीत कथित अघोरी पूजा करून कुटुंबात भीती निर्माण केल्याच्या या प्रकाराचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान कथित मांत्रिक रामनरेश विश्वकर्मा याचा सुगावा लागताच पोलिसांनी त्याला भिलगाव येथून ताब्यात घेत चौकशी केली.
चौकशीनंतर विश्वकर्माला अटक करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनुसार, चौकशीत आरोपी विश्वकर्माने 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 च्या सुमारास स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याच्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयात हजर केले असता 3 सप्टेंबर पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
चितेच्या राखेपासून घरापर्यंत कथित जादूटोण्याचा प्रकार
चितेच्या राखेपासून मृताच्या घराच्या दारापर्यंत कथित जादूटोण्याचा हा प्रकार पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















