– दोन सराईत आरोपी जेरबंद; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दोन वाहने असा तब्बल २ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडीचा एक आणि वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच चोरीची वाहने असा एकूण २ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईमुळे घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना हद्दीत दाखल झालेल्या घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि विश्वासार्ह खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. त्यानंतर ३ सप्टेंबर २०२६ रोजी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी सागर ऊर्फ भांजा अशोक वर्मा (वय २३) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी ६ सप्टेंबर २०२६ रोजी विकास ऊर्फ अंगद लक्ष्मण वर्मा (वय २२) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची वाहने असा सुमारे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोरीच्या मुद्देमालाचा तपशील
घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी सोन्याचे पदक, सोन्याचे कानातील टॉप्स, सोन्याचे पदक व मणी, सोन्याचे गहू मणी तसेच चांदीची पायल व चांदीची चेन असा १ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचोरीच्या दोन गुन्ह्यांतून एक्टिव्हा व पॅशन एक्स-प्रो अशी वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत ७५ हजार रुपये आहे. अशाप्रकारे दोन्ही प्रकरणांतून एकूण २ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहायक पोलिस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक करीम पठाण, तपास पथक प्रमुख सपोनि अजय जाधव, पोलिस हवालदार रविकुमार शाहू, प्रदीप पवार, पोलिस अंमलदार मंगेश लोही, संतोष पांडे, अनिल जाधव, प्रफुल्ल गोहोकार आदींनी ही कारवाई केली.
Author: संतोष तायडे
संपादक















