‘दरोडा’ टाकण्याआधीच बिहारची टोळी पोलिसांच्या जाळ्यात!

– विद्यानगरात चार दरोडेखोर गजाआड; चाकू, टॉमी, मिरची पावडरसह ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त
– ४ जणांना अटक, फरार साथीदारांचा शोध सुरू

The Exposer
नागपूर : शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या बिहारमधील आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने पर्दाफाश केला. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर येथील मोकळ्या जागेत पोलिसांनी घेराव घालत चार दरोडेखोरांना रंगेहात पकडले. अंधाराचा फायदा घेत काही साथीदार पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बमबम राजेंद्र साह (२५), गगनकुमार शिवन साह (२२), भरतकुमार उपेंद्र साह (३२) आणि राहुलकुमार चंदन साह (२२) या सर्व कटिहार, बिहार येथील आरोपींचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींकडून धारदार चाकू, लोखंडी कटवणी, टॉमी, मिरची पावडर, दोरी आणि चार मोबाईल असा एकूण ६१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कारवाई केल्याने शहरातील संभाव्य मोठा गुन्हा टळला.

ज्येष्ठ महिलांना बनवायचे लक्ष्य!

पोलिसांच्या चौकशीत या टोळीचे साथीदार रितिककुमार साह, राजकुमार साह, धिरनकुमार साह आणि अमरकुमार साह यांनी नंदनवन आणि गणेशपेठ परिसरात वयोवृद्ध महिलांना हेरून त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

‘सोन्याचे दागिने आणि तांब्याची भांडी चमकवून देतो’ असे आमिष दाखवून महिलांकडील सोन्याचे दागिने लंपास करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या टोळीने अशाच पद्धतीने केलेल्या दोन सोनसाखळी चोरीच्या घटना पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत.

नंदनवन परिसरातून सुमारे ७० हजार रुपये किमतीची १४ ग्रॅम सोन्याची साखळी, तर गणेशपेठ परिसरातून सुमारे ५५ हजार रुपये किमतीची १२ ग्रॅम सोन्याची साखळी चोरी केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. अटक आरोपींच्या चौकशीतून आणखी किती गुन्हे उघडकीस येतात, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More