‘मारबत’ मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर!; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडून मार्गाची पाहणी

– ११ सप्टेंबरच्या ऐतिहासिक मारबत-बडगा मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचा आढावा
– गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस तैनाती, सीसीटीव्ही अन् तांत्रिक यंत्रणेतून निगराणी

The Exposer
नागपूर : तान्हा पोळ्यानिमित्त ११ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित ऐतिहासिक मारबत-काळी मारबत व बडगा उत्सवाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रविवारी (६ सप्टेंबर) मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कायदा व सुव्यवस्था, वाहतूक आणि पोलिस बंदोबस्ताचा सविस्तर आढावा घेतला.

दुपारी १२ ते १.३० वाजेदरम्यान झालेल्या या पाहणीदरम्यान मिरवणुकीचा मार्ग, गर्दीची ठिकाणे, सुरक्षा व्यवस्था, गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था तसेच पोलिस बंदोबस्ताची तयारी तपासण्यात आली. मिरवणुकीचा मार्ग तहसील, पाचपावली, लकडगंज, कोतवाली आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जात असल्याने संबंधित भागातील व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

पोलीस आयुक्तांनी मिरवणूक मार्गावरील गल्ल्याबोळ आणि गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक माध्यमांच्या सहाय्याने मिरवणुकीवर निगराणी ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. मारबत मिरवणूक शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

या पाहणीवेळी महापौर निता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी वखरे, मनपा आयुक्त विपीन इटनकर, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त उत्तर विभाग विनिता शाह, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, संदीप पखाले यांच्यासह मिरवणूक मार्गावरील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व अंमलदार तसेच नगरसेवक हेमंत बरडे आणि मारबत समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

प्रशासनाचा स्पष्ट संदेश

मारबत मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांचा ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त; सीसीटीव्हीपासून वाहतूक नियंत्रणापर्यंत प्रत्येक हालचालीवर नजर राहणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More