– मिशन डेतून झोपडपट्टी परिसरात फ्लॅगमार्च; एससी-एसटी बजेट वाढीसह ओबीसी जनगणना, बॅकलॉग भरण्याची मागणी
The Exposer
नागपूर : बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) दक्षिण व दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जाटतरोडी परिसरात ‘संडे मिशन डे’ अंतर्गत जनजागृती फ्लॅगमार्च काढण्यात आला. रविवारी, ६ सप्टेंबर रोजी जाटतरोडी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून या अभियानाला सुरुवात करण्यात आली.

यानंतर जाटतरोडीतील झोपडपट्टी, स्लम, रेल्वे लाईन आणि नाला परिसरातून कार्यकर्त्यांनी फ्लॅगमार्च काढत नागरिकांमध्ये विविध सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती केली. एससी-एसटीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पीय तरतूद वाढवून त्याचा स्वतंत्रपणे संपूर्ण खर्च करावा, एससी, एसटी व ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सरकारी शाळा, रुग्णालये आणि वसतिगृहांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे तातडीने वितरित करावेत, तसेच खासगी क्षेत्रात आरक्षण धोरण लागू करावे, अशी मागणीही बसपाच्या वतीने करण्यात आली.
‘रोजी-रोटी दे ना सकी जो, वह सरकार निकम्मी है’, ‘जो सरकार निकम्मी है, वह सरकार बदलनी है’, ‘ईव्हीएम हटाव, देश बचाओ’, ‘बहुजन महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में’, ‘भारतीय संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
एसआयआरच्या प्रक्रियेत कोणताही मतदार मतदारयादीपासून वंचित राहू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. निवडणुका नसतानाही मागील दोन महिन्यांपासून दर रविवारी बसपाकडून फ्लॅगमार्चच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या शैक्षणिक, आरोग्य आणि नागरी समस्यांवर जनजागृती केली जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या फ्लॅगमार्चचे नेतृत्व नागपूर शहर बसपाचे अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, दक्षिण नागपूर विधानसभा अध्यक्ष सहदेव पिल्लेवान आणि दक्षिण-पश्चिम विधानसभा अध्यक्ष सौरभ जामगडे यांनी केले.
यावेळी बसपाचे युवा नेते सुरेंद्र डोंगरे, पंकज नाखले, सदानंद जामगडे, राकेश गजभिये, सौरभ गाणार, संभाजी लोखंडे, शुभम पिल्लेवान, रामकृष्ण ढोके, विकास गायकवाड, धम्मपाल वाळके, रौनक जांभुळकर, सुनील शेंडे, चीराग मेश्राम, प्रेम पाटील, अक्षय सोनटक्के, आशिष खैरे, विकास भटकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बसपा कार्यकर्ते निवडणुका नसतानाही थेट नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असल्याने या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा बसपाच्या वतीने करण्यात आला.
Author: संतोष तायडे
संपादक















