उपराजधानीत ‘अवैध’ पेट्रोल-एलपीजी पंपाचा धडाका; अग्निसुरक्षेच्या नियमांनाही हरताळ?

– ऑटोमोटिव्ह चौकातील बीपीसीएल पंपाबाबत गंभीर तक्रार; मंजुरीविना बांधकाम करून पेट्रोल-एलपीजी स्टोरेजचा वापर सुरू असल्याचा आरोप

The Exposer
नागपूर : उपराजधानी नागपुरात पेट्रोल आणि एलपीजीसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या साठवणुकीशी संबंधित सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऑटोमोटिव्ह चौक, सिटी सर्व्हे क्रमांक 12/2/17, कळमना रोड परिसरातील बीपीसीएल ऑटोमोटिव्ह पेट्रोल पंपाबाबत अनधिकृत बांधकाम आणि आवश्यक मंजुरीशिवाय वापर सुरू असल्याची तक्रार समोर आली आहे. यामुळे संबंधित पंपाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरी हक्क संरक्षण मंचाचे केंद्रीय अध्यक्ष जनार्दन मून यांनी 9 सप्टेंबर 2026 रोजी आसीनगर झोनच्या सहाय्यक आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे. तक्रारीत संबंधित पंपाचे मालक चैतन्य तेलंग यांचा उल्लेख असून, प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाजूला असलेल्या जागेवर सक्षम प्राधिकरणाची मंजुरी न घेता बांधकाम करून बीपीसीएल पेट्रोल पंप/एलपीजी पंपासाठी त्याचा वापर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अग्निशमन विभागाच्या पत्रानेही प्रश्न गंभीर

या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारे म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचे पत्र. 27 ऑगस्ट 2026 रोजी आसीनगर झोनच्या सहाय्यक आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात “अनधिकृत बांधकाम व मंजुरीविरुद्ध इमारतीचा वापर होत असल्याबाबत” असा विषय नमूद करण्यात आला आहे.

पत्रानुसार, संबंधित बीपीसीएल ऑटोमोटिव्ह पेट्रोल पंपाच्या ठिकाणी पहिल्या मजल्याच्या इमारतीसाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी न घेता अनधिकृत बांधकाम करून स्टोरेज (BPCL पेट्रोल पंप/LPG पंप) वापर सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद आहे.

अग्निसुरक्षा उपाययोजनांवरही सवाल

अग्निशमन विभागाच्या पत्रात संबंधित इमारतीत अग्निसुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्यामुळे इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील बनला आहे.

आता कारवाई कोण करणार?

अग्निशमन विभागाने संबंधित बाब आपल्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही पुढील कारवाई नेमकी कितपत झाली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरी हक्क संरक्षण मंचाने संबंधित बांधकाम व वापराबाबत नियमानुसार योग्य कार्यवाही करून त्याची माहिती देण्याची मागणी केली आहे.

पेट्रोल आणि एलपीजीसारख्या ज्वलनशील पदार्थांशी संबंधित ठिकाणी अग्निसुरक्षेचे नियम आणि सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मनपा प्रशासन या तक्रारीवर काय कारवाई करते, संबंधित पंपाकडे आवश्यक मंजुरी व अग्निसुरक्षा व्यवस्था आहे का आणि पत्रातील आक्षेपांची वस्तुस्थिती काय आहे, याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More