गावागावांत स्वाभिमानाची मशाल पेटविणारे ‘सूरसेनापती’ नागोराव पाटणकर!

– आंबेडकरी लोकप्रबोधनाच्या अविस्मरणीय वारशाला उजाळा; प्रकाशनाथ पाटणकर यांना ‘सूरसम्राट नागोराव पाटणकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

The Exposer
नागपूर : आंबेडकरी चळवळीचा विचार आपल्या दमदार पहाडी आवाजातून गावागावांत पोहोचवून जनमानसात स्वाभिमान, समता आणि संघर्षाची जाणीव जागविणारे ‘सूरसेनापती’ नागोराव पाटणकर हे आंबेडकरी लोकप्रबोधनाच्या इतिहासातील अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांच्या स्मृती आणि सामाजिक-कलात्मक योगदानाला अभिवादन म्हणून रिपब्लिकन मूव्हमेंट, नागपूर यांच्या वतीने ‘सूरसम्राट नागोराव पाटणकर जीवनगौरव पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. या पुरस्काराचा पहिला मान नागोराव पाटणकर यांचे पुत्र तथा प्रसिद्ध लोकगायक प्रकाशनाथ पाटणकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्काराचे वितरण ३ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यात करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन मूव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे यांनी दिली.

कलेला बनविले समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम

नागोराव पाटणकर यांनी गायकीकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता, सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणून तिचा वापर केला. गीत, कव्वाली आणि लोकप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता, स्वाभिमान, शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या पहाडी आवाजातील प्रत्येक शब्द श्रोत्यांच्या मनाला भिडत असे. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांच्या गीतांचा आशय आणि सामाजिक संदेश जनमानसात दीर्घकाळ घुमत राहायचा.

धम्मक्रांतीच्या संदेशाचा गावागावांत जागर

१९५६ मध्ये नागपूर येथे झालेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यानंतर निर्माण झालेल्या नव्या सामाजिक चेतनेच्या प्रवाहात नागोराव पाटणकर यांच्या लोकप्रबोधनाची भूमिका महत्त्वाची ठरली. धम्मदीक्षेचा संदेश आणि बाबासाहेबांचा विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी आपल्या कलेची ताकद वापरली. गावागावांत जाऊन जनजागरण करताना ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या विचारांचा प्रभावी जागर त्यांनी केला.

त्यांच्या कार्यक्रमात गीत सुरू होताच वातावरण भारावून जात असे. आवाजातील चढ-उतार, शब्दांवर दिलेला भर, आशयपूर्ण रचना आणि उत्स्फूर्त सादरीकरण यामुळे श्रोते त्यांच्या गीतांशी एकरूप होत. मराठीसोबत हिंदी आणि उर्दू शब्दांचा सहज वापर त्यांच्या गायकीचे आणखी एक वैशिष्ट्य होते.

‘आवाज मात्र मनात जिवंत’

१० सप्टेंबर १९७९ रोजी नागोराव पाटणकर यांचे निधन झाले. मात्र, काळ बदलला, पिढ्या बदलल्या तरी त्यांच्या आवाजातून दिलेला स्वाभिमान आणि परिवर्तनाचा संदेश आजही स्मरणात आहे. वंचित, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या वेदनांना त्यांनी आपल्या कलाविष्कारातून आवाज दिला. सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा देतानाच स्वाभिमानाने जगण्याची उमेद त्यांच्या गीतांमधून निर्माण झाली.

त्यांच्या कार्यामुळे नागोराव पाटणकर हे केवळ गायक न राहता लोककलावंत, प्रबोधनकार आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी वाहक म्हणून ओळखले गेले. त्यांच्या योगदानामुळे आंबेडकरी लोककलेच्या समृद्ध परंपरेत त्यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते.

वडिलांचा प्रबोधनाचा वारसा पुत्राकडून पुढे

नागोराव पाटणकर यांचा लोकप्रबोधनाचा वारसा त्यांचे पुत्र प्रकाशनाथ पाटणकर यांनी पुढे नेला आहे. लोकगीत, गायकी आणि प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी विचारांचा प्रचार-प्रसार केला. चळवळीच्या विचारांना जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची पहिल्या ‘सूरसम्राट नागोराव पाटणकर जीवनगौरव पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे.

रिपब्लिकन मूव्हमेंटतर्फे सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार केवळ एका कलावंताचा गौरव नसून आंबेडकरी लोककला, सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तनवादी विचारपरंपरेचा सन्मान आहे. नागोराव पाटणकर यांच्या स्मृती जपत त्यांच्या विचारांची मशाल पुढे नेणाऱ्या कलावंतांचा गौरव करण्याचा हा उपक्रम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

नागोराव पाटणकर यांच्या सुरांनी पेटविलेली स्वाभिमानाची मशाल आणि सामाजिक परिवर्तनाची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे, हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More