– सामाजिक एकोपा आणि बंधुभावाच्या ध्येयाने सुरू झालेल्या मंडळाचा यंदा ५० वा गणेशोत्सव; ५१व्या वर्षात दिमाखदार पदार्पण
The Exposer
नागपूर : दक्षिण नागपुरातील अजनी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील छत्रपती शिवराया चौक, सद्गुरु वाडी, जुना बाभुळखेडा येथील नवशक्ती गणेश मंडळाने यंदा ५० वर्षांची गौरवशाली परंपरा पूर्ण केल्याचा दावा केला असून, मंडळ ५१व्या वर्षात दिमाखदार पदार्पण करीत आहे. सामाजिक बांधिलकी, परिसरातील एकोपा आणि बंधुभाव कायम राखण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या मंडळाचा सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सव यंदा विशेष उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

नऊ नागरिकांनी सुरू केली गणेशोत्सवाची परंपरा
सन १९७७ मध्ये परिसरातील नऊ नागरिकांनी एकत्र येत नवशक्ती गणेश मंडळाची स्थापना केली आणि गणेशोत्सवाला सुरुवात झाली. मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून चंद्रकांत राऊत यांनी जबाबदारी सांभाळली. सुरुवातीच्या काळात परिसरातील वाड्यात गणरायाची स्थापना केली जात होती. कालांतराने मंडळाच्या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले आणि आज या मंडळाने सामाजिक उपक्रमांसह गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मंडळाच्या या प्रदीर्घ वाटचालीत अनेक चढ-उतार आले; मात्र गणरायाच्या स्थापनेची परंपरा अखंड राहिली. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या कठीण काळातही शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे उत्सवाच्या परंपरेत खंड पडला नाही.
सामाजिक उपक्रमांसह ३ ते ४ हजार नागरिकांना प्रसाद
नवशक्ती गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी भजन, कीर्तन, सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी तब्बल ३ ते ४ हजार नागरिकांना प्रसादरूपी भोजन देण्यात येते.
गर्दी टाळण्यासोबतच प्रत्येक नागरिकाला भोजनाचा लाभ मिळावा, यासाठी टिफिनच्या माध्यमातून भोजन देण्याची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात येते. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
मंडळातील सदस्यांच्याच हातून साकारतो गणराया
नवशक्ती गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीचीही विशेष परंपरा आहे. मंडळाचे सदस्य विशाल देवकर यांनी सलग तीन वर्षे स्वतः तयार केलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून मंडळाचे सदस्य अमित खोब्रागडे यांनी साकारलेल्या गणेशमूर्तीची स्थापना केली जात आहे. यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अमित खोब्रागडे निर्मित १० फूट उंचीच्या गणेशमूर्तीची १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता स्थापना करण्यात येणार आहे. यावेळी ५१ सुवासिनींच्या हस्ते आरती करून गणरायाची स्थापना केली जाणार आहे.
पारंपरिक मंदिराच्या स्वरूपातील भव्य मंडप
मंडळाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदाच्या गणेशोत्सवासाठी पारंपरिक मंदिराच्या स्वरूपातील आकर्षक मंडपाची थीम साकारण्यात येत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाची आठवण कायम राहावी, यासाठी मंडळाचे जुने-नवे सदस्य तसेच दरवर्षी मंडळाला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
ढोल-ताशांच्या गजरात भव्य विसर्जन मिरवणूक
गणेश विसर्जनाच्या वेळी दरवर्षी परिसरातील ४०० ते ५०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप दिला जातो. यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने विसर्जन सोहळ्यालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरींचीही मंडळाला भेट

नवशक्ती गणेश मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल विविध मान्यवरांनी घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मंडळाला भेट देऊन मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली आहे, ही मंडळासाठी विशेष अभिमानाची बाब असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पदाधिकारी व सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग
५० वर्षांची परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि नव्या पिढीचा उत्साह यांचा संगम साधत नवशक्ती गणेश मंडळ सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. मंडळाचे अध्यक्ष संदीप इंगळे, सचिव प्रणय बानाईत, कोषाध्यक्ष अनुप कांबळे, उपाध्यक्ष मनोज बोरकर, सहसचिव अनिकेत इंगळे आणि सहकोषाध्यक्ष राकेश ठाकरे, सदस्य विशाल देवकर, धिरज बानाईत, तुषार राऊत, दिपेश बानाईत, अपूर्व इंगळे, महेश गायकवाड, गिरीश मेश्राम, शुभम बारई, स्वानिल शिंदे, निलेश ठाकरे, शेखर मदनकर, कोमल बानाईत, भूषण देवकर, मृणाल गावळी, सचिन मदनकर, तुषार गोडाम, रजत हुडे, अमित खोब्रागडे, जतिन इंगळे, अक्षय ठाकरे, ब्रिजेश खडसे, पियुष नेतनकर, श्याम कोहळनकर, सचिन सौदागर, वेदांत मदनकर, वंश लांडे, अमित मोई, प्रणय येसनकर, अंशुल मराठे, अनुज मराठे, प्रविण पटेल, कार्तिक गोमकर, निशांत सावरकर आणि कुणाल हलमारे आदी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
सामाजिक एकोप्याचा आणि बंधुभावाचा उत्सव

पन्नास वर्षांची अखंड गणेशोत्सवाची परंपरा, सामाजिक कार्याची जोड आणि परिसरातील नागरिकांचा विश्वास या बळावर नवशक्ती गणेश मंडळाने ५१व्या वर्षात दमदार पाऊल ठेवले आहे. त्यामुळे यंदाचा सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता पाच दशकांच्या सामाजिक एकोप्याचा आणि बंधुभावाचा उत्सव ठरणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी सांगितले.
Author: संतोष तायडे
संपादक















