खुनाचा गुंता चार तासांत उकलला! नागपूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

– अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून तीन आरोपी जेरबंद
– तांत्रिक तपास, सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध

The Exposer
नागपूर : शहरातील पो. ठाणे तहसील हद्दीतील कसार भवन चहा टपरीजवळ आढळलेल्या अनोळखी इसमाच्या मृतदेहाच्या खुनाचा गुंता नागपूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या चार तासांत उकलत तीन आरोपींना ताब्यात घेऊन धडाकेबाज कामगिरी बजावली. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीचा प्रभावी वापर करत पोलिसांनी मृताची ओळख पटवून आरोपींपर्यंत थेट मजल मारली.

दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २ ते २.३० वाजताच्या सुमारास पो. ठाणे तहसील हद्दीतील कसार भवन चहा टपरीजवळ एका अनोळखी इसमाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पद्धतीचा वापर करून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव मनीष चंद्रशेखर मोहिते (वय अंदाजे ३५ वर्षे), रा. नाईट हायस्कूलजवळ, पो. ठाणे कोतवाली, नागपूर शहर, असे निष्पन्न झाले.

त्यानंतर गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून मृत मनीष मोहिते यांच्या खुनाच्या संशयावरून कुणाल अनिलराव झाडे (वय ३०), रा. चितारओळी बडकस चौक, महाल, पो. ठाणे कोतवाली, नागपूर; विनय यशवंतराव पौनिकर (वय ३५), रा. इतवारी सिटी ऑफिस, वारसकर रोड, खापरीपुरा, नागपूर; तसेच निखिल उर्फ रूपेश धर्मेंद्र चव्हाण (वय २५), रा. लकडगंज पोलीस चौकी मागे, पो. ठाणे लकडगंज, नागपूर यांचा शोध सुरू करण्यात आला.

पोलिस पथकाने आरोपींचा माग काढत ते एमआयडीसी हद्दीत गो गॅस पंपाजवळ लपून बसल्याची माहिती मिळवली. ही माहिती वरिष्ठांना देऊन पथकाने तातडीने कारवाई केली. सुमारे सायंकाळी ५.३० वाजता आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत खुनामागील कारणाबाबत आरोपीने मृतकाचा जुन्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग

या उल्लेखनीय कारवाईस पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा वैभव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्यक्ष तपासात पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर चिंधबाजी काठोके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. ३च्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

या पथकात सपोफो संतोष ठाकूर, सपोफो ईश्वर खोरडे, पोहवा मनोज नेवारे, पोहवा विजय श्रीवास, पोहवा अजय पाटील, पोहवा दिनेश डवरे, पोशि रोहित काळे, पोअं दीपक दासरवार, पोअं जितेश रेड्डी, पोअं चंद्रशेखर डेकाटे, पोअं विवेक भोयर, पोशि विशाल रोकडे, पोशि मंगेश मेत्राम, पोशि प्रमोद देशभ्रतार, गुन्हे शाखा १ चे सपोनि राजाभाऊ जाधव, स्टाफ श्रेणीअंनि ओमप्रकाश कोठे, पोहवा प्रितम यादव, पोहवा योगेश वासनिक, पोअं पंकज ठवकर यांचा समावेश होता. तसेच सायबर गुन्हे शाखेचे पोउपनि झिंगरे व पथक आणि पोउपनि नदगिरी यांनीही तपासात मदत केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(२), ३(४) अन्वये पोलीस ठाणे तहसील येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपींना तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More