वादळवा-यातला अनिल  – विवेक मोरे

       एक वर्ष झालं अनिलला जाऊन. अनिल म्हणजे वारा. पण हा साधा वारा नव्हता. तर तो खरच वादळवारा होता. अनिल म्हणजे अनिल यशवंते होय. जरी तो श्रावण यशवंतेंचा मुलगा असला तरी त्याने कधीच स्वतःचे नाव, ‘अनिल श्रावण यशवंते’ असं सांगीतलेलं मला आठवत नाही. याचा अर्थ त्याला आपल्या वडिलांचा अभिमान नव्हता, असे मुळीच नाही. अनिलला आपल्या वडिलांचा निश्चितच सार्थ अभिमान होता. काळाचौकीत तो एकट्याच्या बळावर अत्यंत स्वाभिमानाने आपल्या वडिलांचा स्मृतीदिन कित्येक वर्ष साजरा करायचा. पण आपण श्रावण यशवंतेंचा मुलगा असल्याचा त्याने कधीच टेंभा मिरवला नाही. किंवा यासाठी कोणाकडेच त्याने लाचारीचा हात पसरला नाही. तो जिथे राहतो त्या काळाचौकी परिसरातील चौकाला श्रावण यशवंते चौक, असं नाव आहे.

अनिलच्या जागी इतर कोणी असता तर त्याने या भांडवलावर शासनाकडून सहज एखादं प्रशस्त घर किंवा इतर काही लाभ मिळवून मोकळा झाला असता. पण अनिलच्या स्वभावात ते अजिबात बसणारं नव्हतं. म्हणून तर अनिल शेवटपर्यंत आपल्या संयुक्त कुटुंबासह काळाचौकीच्या त्या झोपडीवजा छोट्याशा घरात स्वाभिमानाने राहिला. श्रावण यशवंतेच्या मुलाला घर द्या म्हणून त्याने कधीच शासनाकडे वा समाजाकडे रडगाणे गायले नाही. 

अनिलच्या याच स्वभावामुळे त्याला चांगले, चांगले टरकून असायचे. कारण सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेला अनिल, आंबेडकरी विचारावर अगदी कट्टर असा तत्त्वनिष्ठ होता. याबाबतचा एक प्रसंग सांगतो. एक फार मोठ्ठा साहित्यातील डाॅक्टरेट मिळवणारा एक कवी होता. आता तोसुध्दा हयात नसल्याने मी त्या कवीचे नाव सांगत नाही. तर अशा या मोठ्ठ्या कवीची ब्राह्मणांवर टिका करणारी एक जबरदस्त लोकप्रिय कविता आहे. हरेक झोपडपट्ट्यांमध्ये, आंबेडकरी वस्त्यांमध्ये हा मोठ्ठा कवी ही कविता आवर्जून म्हणायचा आणि लोकंही त्याच्या या कवितेला भरभरुन दाद द्यायचे. एकदा विलेपार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघात निमंत्रित कवींचं कविसंमेलन होतं आणि या कविसंमेलनात हा मोठ्ठा कवीही निमंत्रित होता.

मी सुध्दा त्यावेळेस पार्ल्याच्या शाळेत कामाला होतो. अनिल यशवंतेने मला या कार्यक्रमाची माहिती फोन करुन दिली. मग मी त्याला माझ्या शाळेवरच बोलावले. अनिल आल्यानंतर शाळा सुटल्यावर मी आणि अनिल त्या लोकमान्य सेवा संघाच्या हाॅलवर पोहोचलो. आम्ही अगदी दुसर्‍या रांगेतच बसलो. चार, पाच कवी झाल्यानंतर सूत्रसंचालकाने या मोठ्ठ्या कवीचं नाव पुकारलं. हा मोठ्ठा कवी, कविता बोलण्यासाठी माईकजवळ पोहोचण्या अगोदरच अनिल तिरासारखा धावत त्या मोठ्ठ्या कवीजवळ पोहोचला. त्या मोठ्ठ्या कवीला कोपर्‍यात घेऊन अनिलने त्याला बजावले की, ‘आत्ता पण, आमच्या वस्तीत तू जी बामणाची कविता म्हणतोस ना, तीच कविता येथे म्हणायची. जर ही कविता न म्हणता तू प्रेमाबिमाची कविता म्हणालास तर याद राख. मी स्टेजखालीच उभा आहे. नाय तुझे कानशील फोडले तर नाव सांगणार नाय!’ आणि हे ऐकल्यावर त्या मोठ्ठ्या कवीची बोबडीच वळली. त्याच्या हातापायाला कंप सुटला. मग लटपटत्या पायाने घामाघूम होवून त्या मोठ्ठ्या कवीने कशीबशी तीच बामणाची कविता म्हटली. घरी परतताना मला जेंव्हा हे अनिलने सांगीतले तेंव्हा हसून, हसून माझे पोट दुखायला लागले. तर असा हा आमचा अनिल! स्वाभिमानी, निर्भीड, तत्त्वनिष्ठ आणि एकदम रोखठोक!

तसा अनिलच्या आणि माझ्या वयात फारसे अंतर नाही. असलाच तर दोन, एक वर्षाचा फरक असेल. मी भायखळ्याला भाई संगारे राहत त्या बिआयटी चाळीत रहायचो आणि अनिल काळाचौकीत रहायचा. त्यावेळेस महालक्ष्मीचा पँथर जयवंत कांबळे, लव्हलेनचा पँथर शहिद भागवत जाधवचा लहान भाऊ सुमेध, खाचरा चाळीतला आर्टिस्ट सकपाळ, काळाचौकीचा अनिल आणि मी दर एक दिवसाआड संध्याकाळी सातरस्त्याच्या ‘फ्रि इंडिया’ हाॅटेलमध्ये भेटायचो. विषय असायचा आंबेडकरी चळवळ. तासंतास आमच्या चर्चा झडायच्या. यावेळेस आम्हाला अनिलचा त्या,त्या विषयाचा अभ्यास जाणवायचा. अगदी त्या काळात आमच्या चाळीतले मित्र हिंदी पिक्चरच्या गाण्याची पुरती वाट लावत असत. उदाहरणार्थ…,

संडास का डब्बा पानीसे भरके नदीकी ओर चलेऽऽऽऽ,

एऽऽऽ निले गगनके तले, धरतीका प्यार पले.

किंवा….,

आयी मिलन की बेला,

भैय्या पादून पादून मेला!

अशा थिल्लर वातावरणातही अनिलचे त्या काळातल्या बाॅलिवूडवर बारिक लक्ष असायचे. त्या वेळेस मनोजकुमारचा पुरब-पश्चिम हा सिनेमा सुपर हिट चालला होता. त्यातील, नांगर ओढताना मनोजकुमार, ‘मेरे देश की धरती सोना उगले’, हे गाणे म्हणताना दाखवलाय. त्यावर अनिल म्हणायचा, एवढा राजबिंडा शेतकरी संपूर्ण देशात शोधून सापडणार नाही. म्हणजेच रोमँटिक मूडमध्ये असणाऱ्या माणसाला फाडकन कानाखाली मारुन त्याला वास्तव भूमीवर आणण्याची अनिलची ही नेहमीची स्टाईल असायची. हे फक्त एक उदाहरण झालं. बाॅलिवूडच्या अशा कित्येक पिक्चरवरचे त्याचे ताशेरे खरोखरच चिंतनीय असायचे. अनिलने ते जर लिहून काढले असते तर खरोखरच या विषयावरचा एक उत्कृष्ट प्रबंध तयार झाला असता. पण अनिलला असं काही म्हटलं की, तो म्हणायचा, ते तू लिही.

कुठल्याही विषयावर आम्हाला अनिलचे मत अत्यंत आवश्यक वाटायचे. उठाव साहित्य मंच निर्माण होण्याआधी आम्ही जे ‘उठाव’ नावाचे सामाजिक संघटन निर्माण केले होते, त्यावेळेस त्या बैठकीत अनिल सहभागी होता. इतकच नव्हे तर आम्ही सोळा वर्षापूर्वी जी बुध्दिस्ट रिपब्लिकन निर्माण केली होती, त्या निर्मिती प्रक्रियेत अनिलचा प्रामुख्याने महत्वाचा सहभाग होता. आम्हा मित्रांच्या प्रत्येक सुख, दुःखाच्या प्रसंगात अनिल आवर्जून हजर असायचा. फक्त श्रावण यशवंतेंचा मुलगा ही ओळख अनिलला मान्य नव्हती. बाबासाहेबांच्या मुक्ती कोण पथे! या एका भाषणावर त्याने संपूर्ण महाराष्ट्रभर एकट्याने प्रबोधनपर चळवळ उभी केली होती. या चळवळीसाठी स्वतः पदरमोड करुन तो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरायचा. महाराष्ट्रातील या चळवळीचे हजारो कार्यकर्ते त्याने उभे केले आहेत. आज ते सुध्दा अनिलला श्रध्दांजली वाहण्यासाठी काळाचौकीत निश्चित येतील, ही मला खात्री आहे.

दहा जानेवारीला लव्हलेनमध्ये शहिद भागवत जाधव यांचा शहिद दिन सुमेध साजरा करायचा आणि अठ्ठावीस जानेवारीला अनिल, काळाचौकीत श्रावण यशवंतेंचा स्मृतीदिन साजरा करायचा. प्रत्येक दहा जानेवारीला अनिल, शहिद भागवत जाधवांच्या शहिद दिनाला लव्हलेनमध्ये हजर असायचा. पण तो कधीच पुढे यायचा नाही. कारण हल्ली या कार्यक्रमात नेहमीच कम्युनिस्टांचं वर्चस्व असायचं. आणि अनिल अगदी प्रथमपासूनच कम्युनिस्टांचा कट्टर विरोधक. एकदा तर या कार्यक्रमात सुमेधने कम्युनिस्ट शाहीर गदरलाही बोलावले होते. त्यामुळे अनिल अस्वस्थही व्हायचा. त्याची ही अस्वस्थता तो आमच्याजवळही व्यक्त करायचा. दोन वर्षापूर्वी सुमेधने हा शहिद दिन सार्वजनिकरीत्या करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर अनिलने सुमेधकडे हा शहिद दिन त्याला करण्याची परवानगी मागितली. सुमेधनेही ती परवानगी दिली. आणि मग प्रथमच शहिद भागवत जाधवांच्या शहिद दिन कार्यक्रम पत्रिकेत भगवान बुध्दांचा फोटो अनिलने आवर्जून छापला होता. या कार्यक्रमात अनावधानाने दोन वेगवेगळ्या कार्यक्रम पत्रिका छापल्याने थोडा गोंधळ निर्माण झाला होता. तरीही अनिलने अत्यंत संयम दर्शवून हा कार्यक्रम तडीस नेला. मला वाटते त्यानंतरच्या श्रावण यशवंतेच्या स्मृतीदिनात अनिलची भेट झाली ती शेवटचीच. त्यानंतर तो आजारी झाला आणि त्याने अचानक एक्झिटच घेतली. खरं तर सध्याच्या उपवर्गिकरणाच्या विरोधाच्या काळात आज अनिल यशवंतेसारख्या ध्येयनिष्ठ आंबेडकरी कार्यकर्त्याची चळवळीला खुप गरज होती. अनिल यशवंतेंसारखा चैतन्याने सळसळणारा अभ्यासू, विचारवंत मित्र आपल्यात नाही, हे खरच वाटत नाही. आज या दिलदार मित्राचा पहिला स्मृतीदिन आहे. आज मी तिथे काळाचौकीत असायला हवा होतो. पण माझ्या आजारपणामुळे मला तिथे उपस्थित राहता येत नाही, याचे मला अतिव दुःख आहे. बाबासाहेबांच्या मुक्तीपथावर चालणाऱ्या या झुंझार भिमयोध्दा असलेल्या माझ्या या जानी दोस्ताला आमच्या उठाव साहित्य मंचाच्या वतीने विनम्र आदरांजली! जयभीम!

 – विवेक मोरे, मुंबई

मो.नं. 8451932410  

( वरील दोन्ही फोटो अनिल यशवंते यांचे आहेत. उजव्या बाजूचा फोटो अनिल यांच्या तरुणपणातला आहे.)

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More