नागपूरच्या वाहतुकीला ‘एलिव्हेटेड’ वेग!; बहुप्रतीक्षित दिघोरी उड्डाणपुलाचे उद्या लोकार्पण

– फडणवीस–गडकरींच्या हस्ते होणार उद्घाटन; ८.९ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे इंदोरा ते दिघोरी मार्गावरील वाहतूक कोंडीला मिळणार मोठा दिलासा

The Exposer
नागपूर : नागपूरकरांच्या प्रतीक्षेला अखेर उद्या, शनिवार (१९ सप्टेंबर) पूर्णविराम मिळणार आहे. शहराच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या बहुप्रतीक्षित इंदोरा–दिघोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळा सायंकाळी ५ वाजता प्रिया बार चौक, रेशीमबाग येथे होणार आहे.

तब्बल ८.९ किलोमीटरचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूरच्या सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एका मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्पात ६.३७ किलोमीटरचा उड्डाणपूल, तसेच सर्व्हिस व स्लिप रस्त्यांचा समावेश आहे. प्रकल्पाची अंदाजित किंमत ₹९९८ कोटी असून, उड्डाणपुलाची रुंदी १२ मीटर आहे.

भारताच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील खास प्रकल्प

या उड्डाणपुलाचे वैशिष्ट्य म्हणजे Ultra High Performance Fibre Reinforced Concrete (UHPFRC) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. NHAIच्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेला हा भारतामधील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल आहे. विशेषतः भांडे प्लॉट चौक ते दिघोरीदरम्यानच्या सुमारे तीन किलोमीटरच्या भागात UHPFRC गर्डर्सचा वापर करण्यात आला आहे.

दिघोरी, उमरेडसह पूर्व नागपूरला मोठा फायदा

इंदोरा चौक, अशोक चौक, शीतला माता चौक आणि दिघोरी चौक या महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. उड्डाणपुलामुळे लांब पल्ल्याची वाहतूक आणि स्थानिक वाहतूक वेगळी करण्यास मदत होऊन प्रवासाचा वेळ, इंधनाचा वापर आणि वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पात ROB/RUB, विविध रॅम्प, अशोक चौकातील एलिव्हेटेड रोटरी आणि मेट्रो मार्गावरील संरचना यांचाही समावेश आहे. त्यामुळे हा केवळ उड्डाणपूल नसून नागपूरच्या वाहतूक पायाभूत सुविधांमधील मोठा एकात्मिक प्रकल्प ठरत आहे.

उद्यापासून नागपूरच्या रस्ते वाहतुकीला नवा अध्याय

.वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या या मार्गावर अखेर उड्डाणपुलाची सुविधा उपलब्ध होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. दिघोरी उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पूर्व नागपूरमधील दळणवळण अधिक गतिमान होण्यात भर पडणार आहे, हे विशेष. त्यामुळे या लोकार्पण कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन मनपा प्रभाग २८ (दिघोरी) चे नगरसेवक पिंटू झलके यांनी केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More