दगडी कोळशाच्या चोरीचा पर्दाफाश! गुन्हेशाखेचा छापा; ११,६२५ किलो कोळसा जप्त, पाच जण अटकेत

– चोरीचा कोळसा विक्रीच्या तयारीत असतानाच पोलिसांची धडक कारवाई; २.३० लाखांचा मुद्देमाल ताब्यात

The Exposer
नागपूर : गुन्हेशाखा भूमाफिया विरोधी पथकाने दगडी कोळशाची बेकायदेशीर खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध मोठी कारवाई करत एकूण ११,६२५ किलो दगडी कोळसा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दगडी कोळसा, वाहने व मोबाईल असा सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीत, कामठी रेल्वे क्रॉसिंग ते गादा गावाकडून आवंडी गावाकडे जाणाऱ्या रोडवरील गादा शिवारात कारवाई करण्यात आली. रहमत एंटरप्राईजेस फर्म येथे बेकायदेशीररीत्या दगडी कोळशाची खरेदी-विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहितीची खात्री करून पोलिसांनी सकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी फर्मच्या आवारात दगडी कोळशाचे ढिगारे आढळून आले. तसेच चार इसम चारचाकी वाहनांसह तेथे उपस्थित होते.

चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे आहाद फिरोज अहमद (१९), दानिश मोहम्मद अक्रम (२८), चेतन रमेश शेंडे (२४), कुणाल हरीश राजपूत (२७) आणि अतुलसिंग अभिमन्युसिंग (२८) अशी सांगितली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी क्र. ३, ४ व ५ यांनी संगनमताने कन्हान खदान येथून दगडी कोळसा चोरी करून आणल्याचे, तर आरोपी क्र. २ याने तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीकरिता आणल्याचे पोलिसांच्या नोंदीनुसार नमूद आहे.

कारवाईदरम्यान आरोपींच्या ताब्यातून ११,६२५ किलो दगडी कोळसा, तसेच पल्सर, स्कॉर्पिओ आणि दोन हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकली व दोन मोबाईल असा एकूण ₹२,३०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाणे नवीन कामठी येथे कलम ३०३(२), ३१७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी नवीन कामठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) दीपक अग्रवाल, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या महिला पोलिस निरीक्षक संजीवनी थोरात, पोलिस हवालदार भागवत वानखेडे, महेश सेलोकार, पोलिस अंमलदार अमर गणवीर, ऋषिकेश जुमडे या गुन्हे शाखा पोलिस पथकाने केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More