डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील तक्रारींची विद्यापीठाकडून दखल; चौकशी समितीसमोर २५ सप्टेंबरला सुनावणी!

– प्रशासकीय, आर्थिक, सेवाविषयक अडचणींसह मानसिक छळाच्या तक्रारी; कुलगुरूंच्या निर्देशानंतर चौकशी समिती सक्रिय

The Exposer
नागपूर : दीक्षाभूमी परिसरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या विविध गंभीर तक्रारींची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दखल घेतली आहे. प्रशासकीय, आर्थिक आणि सेवाविषयक अडचणींसह मानसिक छळाबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती गठित केली असून, या समितीसमोर संबंधितांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या महाविद्यालय विकास विभागाने १९ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात पत्र जारी केले आहे. या पत्रात डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारी तसेच डॉ. शैलेश बहादुरे व इतर शिक्षक-कर्मचाऱ्यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी सादर केलेल्या पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे.

पत्रानुसार, संबंधित तक्रारींमध्ये विविध प्रशासकीय, आर्थिक व सेवाविषयक अडचणी तसेच मानसिक छळाच्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने मा. प्र-कुलगुरूंच्या निर्देशानुसार डॉ. नितीन कोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.

२५ सप्टेंबरला चौकशी समितीसमोर उपस्थिती

विद्यापीठाने दिलेल्या निर्देशानुसार शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता चौकशी समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांना जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी टी-पॉईंट मार्ग, नागपूर येथील सभाकक्षात समितीसमोर उपस्थित राहण्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. चौकशी समितीमध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. नितीन कोंगरे, तर सदस्य म्हणून विद्यापीठाशी संबंधित विविध पदांवरील प्राध्यापकांचा समावेश असल्याचे पत्रात नमूद आहे.

तक्रारींच्या चौकशीत नेमके काय समोर येणार?

महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रशासकीय कारभार, आर्थिक बाबी, सेवाविषयक प्रश्न आणि मानसिक छळाच्या आरोपांबाबत चौकशी समिती कोणती भूमिका घेते, याकडे आता शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विद्यापीठाने अधिकृत चौकशी प्रक्रिया सुरू केल्याने संबंधित तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी होऊन सत्य परिस्थिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चौकशीनंतर समितीच्या अहवालातून तक्रारींमध्ये करण्यात आलेल्या आरोपांबाबत नेमकी काय वस्तुस्थिती समोर येते, हे स्पष्ट होणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More