मुलांच्या किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट! मामावर लोखंडी रॉडने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

– वाठोड्यात खळबळ; दाम्पत्यासह तिघे खुनाच्या गुन्ह्यात अटकेत, २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

The Exposer
नागपूर : लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या किरकोळ वादाने गंभीर वळण घेतले आणि त्याची परिणती थेट एका व्यक्तीच्या मृत्यूत झाली. बहिणीच्या मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शहबाज शेख इशाक शेख (वय ३६) यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या शहबाज यांचा उपचारादरम्यान बुधवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे वाठोडा परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी येथील मानवशक्ती लेआऊटमध्ये घडली.

मुलांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, शहबाज यांची बहीण गुलनाज अफरीन इमरान खान (वय ३३) यांच्या मुलांचा रुबिना अन्सारी यांच्या मुलांसोबत खेळताना वाद झाला. या वादातून रुबिना आणि इमरान यांनी गुलनाज यांच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गुलनाज यांनी त्यांचा भाऊ शहबाज यांना याबाबत सांगितले. त्यानंतर मंगळवारी रात्री शहबाज हे जाब विचारण्यासाठी इमरान अन्सारी यांच्या घरी गेले.

जाब विचारायला गेले अन् हल्ला झाला

यावेळी शहबाज यांचा इमरान आणि रुबिना यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर इमरान अन्सारी, रुबिना अन्सारी आणि वाहिद अन्सारी यांनी शहबाज यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शहबाज यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

दाम्पत्यासह तिघे पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून इमरान अन्सारी (वय ४०), रुबिना अन्सारी (वय ३८, दोघेही रा. मानवशक्ती लेआऊट, खरबी) आणि वाहिद अन्सारी (वय ३५, रा. एकतानगर) यांना अटक केली आहे. वाहिद हा रुबिनाचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहबाज हे बेकरीसाठी लागणाऱ्या मशिनच्या दुकानात काम करीत होते. इमरान पेंटिंगचे काम, तर वाहिद मेकॅनिकचे काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेमागील नेमका घटनाक्रम, हल्ल्यात वापरण्यात आलेले हत्यार आणि इतर बाबींचा तपास वाठोडा पोलीस करीत आहेत. किरकोळ मुलांच्या वादातून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की, एका कुटुंबातील व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More