– महाराष्ट्र काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; स्वतंत्र व निष्पक्ष पडताळणीची मागणी
The Exposer
नागपूर : आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष पडताळणी करण्यात यावी, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या शिष्टमंडळाने आज, ३० सप्टेंबर रोजी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेत निवेदन साद केले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे नागपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी असल्याची अधिकृत नोंद जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर आहे.
साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांनी जातीय भेदभाव व मानसिक छळाचे आरोप केले आहेत, तर संबंधित संस्थेने अशा तक्रारी पूर्वी प्राप्त झाल्याचे नाकारले आहे. प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणातील नेमके तथ्य तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
याच पार्श्वभूमीवर संपूर्ण घटनाक्रमाची स्वतंत्रपणे पडताळणी व्हावी, सर्व संबंधित बाजू ऐकून घेतल्या जाव्यात आणि साहिल वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने केली आहे.
प्रदेश सचिव राजेश रंगारी, प्रदेश महासचिव प्रफुल्ल भाजे आणि प्रदेश सचिव कपिल दामोदर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी सुनिल पाटील, नरेश खडसे, अनिकेत रंगारी, प्रितम रामटेके, मुकुंदा दुधमोगरे, राधेश्याम राजपूत, सन्नी सहारे, विलास वैतागडे, संजय यावले यांच्यासह अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘दोषी कोण असेल तर कारवाई झालीच पाहिजे’
साहिल वाकोडे यांच्या मृत्यूमागील परिस्थितीची सखोल छाननी होऊन सत्य समोर यावे, कोणत्याही प्रकारचा अन्याय अथवा भेदभाव आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी भूमिका शिष्टमंडळाने निवेदनातून मांडली.
Author: संतोष तायडे
संपादक















