बेलतरोडीतील ‘मॉब जस्टिस’ने पोलिसिंगवरच उपस्थित केले प्रश्न!

– चोरीच्या संशयातून मारहाणीत युवकाचा मृत्यू; खबरी यंत्रणा किती सक्रिय? नागरिकांशी संवाद किती?
– गुन्हा घडण्यापूर्वी रोखण्यासाठी पोलिसिंगची दिशा बदलणार का?

The Exposer
नागपूर : बेलतरोडी परिसरात चोरीच्या संशयातून दोन युवकांना पकडून झालेल्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने कायदा हातात घेण्याच्या मानसिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेत मारहाणीमागे नेमका काय उद्देश होता, तसेच घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी काय होती, हे तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. मात्र त्याचवेळी गुन्हा घडण्यापूर्वीची पोलिसिंग किती प्रभावी आहे, याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एका बाजूला वृद्ध महिलेच्या घरात घुसून लुटमारीचा प्रयत्न झाल्याचा आरोप, तर दुसऱ्या बाजूला संशयिताला पकडल्यानंतर जमावाकडून मारहाण—या दोन घटनांनी नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या यंत्रणेपुढे वेगवेगळे प्रश्न उभे केले आहेत.

खबरी यंत्रणा नेमकी किती सक्रिय?

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद हालचाली, गुन्हेगारी प्रवृत्ती, संवेदनशील ठिकाणे आणि स्थानिक परिस्थितीची माहिती पोलिसांपर्यंत वेळेवर पोहोचणे अपेक्षित असते. बेलतरोडीच्या घटनेनंतर स्थानिक माहितीचे हे जाळे प्रत्यक्षात किती प्रभावी आहे, याचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. खबरी यंत्रणा केवळ व्हेरिफिकेशन, सण-उत्सव किंवा कार्यक्रमांच्या परवानगीपुरती मर्यादित न राहता परिसरातील गुन्हेगारी हालचालींची माहिती देण्यासाठी सक्षम आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे.

पोलिस-नागरिक संवाद कुठे कमी पडतोय?

सोसायट्या, व्यापारी भाग, वसाहती, शाळा-कॉलेज परिसर आणि संवेदनशील भागातील नागरिकांशी पोलिसांचा नियमित संवाद किती आहे? नागरिकांना पोलिस निरीक्षकच नव्हे तर बीट कर्मचारी कोण आहेत, संशयास्पद हालचाल दिसल्यास कोणाला संपर्क करायचा आणि पोलिसांची मदत किती वेगाने मिळू शकते, याची माहिती आहे का? कम्युनिटी पोलिसिंग केवळ बैठका किंवा जनजागृती कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता नियमित बीट संपर्क, गस्त, सुरक्षा बैठका आणि स्थानिक माहिती संकलनाशी जोडण्याची गरज आहे.

‘कायदा हाती’ का घेतला गेला?

संशयित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी जमावाकडून मारहाण होणे कोणत्याही परिस्थितीत कायदेशीर मार्ग नाही. मृत्यूचे नेमके कारण पुढे आले नाही. वैद्यकीय अहवालकडे सर्वांचे लक्ष लागलें आहे. मात्र, संशयित गुन्हेगार असो वा नसो, तपास, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया हाच कायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे प्रश्न केवळ मारहाणीपुरता नाही. नागरिकांना पोलिसांवर विश्वास ठेवून संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात देण्याची खात्री आहे का, याचाही विचार करावा लागेल.

‘क्राईम कंट्रोल’सोबत ‘क्राईम प्रिव्हेन्शन’ही हवे!

गुन्हा घडल्यानंतर आरोपी पकडणे महत्त्वाचे आहेच; मात्र गुन्हा घडण्यापूर्वी त्याची चाहूल घेऊन तो रोखणे ही पोलिसिंगची अधिक व्यापक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रभावी पेट्रोलिंग, सक्रिय बीट पोलिसिंग, स्थानिक माहिती यंत्रणा आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद या चारही बाबींना बळ देणे आवश्यक आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More