– भंडारा, छिंदवाड्याकडे पोलिसांची पथके रवाना; गौरक्षकांचा सवाल—कॅमेरे असूनही तपास कुठे अडकला?
The Exposer
नागपूर : कामधेनू गौशाळेचे संचालक राजूभाई पंडया यांच्या रहस्यमय बेपत्ता झाल्याप्रकरणाचा तपास आता नागपूरबाहेर पोहोचला आहे. लकडगंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या माहितीनुसार, बुधवारी पोलिसांची दोन पथके भंडारा आणि मध्य प्रदेशातील छिंदवाड्याकडे रवाना करण्यात आली आहेत. राजूभाईंचा लवकरच शोध लागेल, अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हेही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
मात्र, पोलिसांच्या या हालचालीदरम्यान शहरातील २२०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. चोरी, मारामारी, हत्या तसेच विविध गुन्ह्यांतील आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग केला जात असताना राजूभाईंच्या बेपत्ता प्रकरणी तपासात अद्याप ठोस धागा का मिळाला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गौरक्षकांचा सवाल : ‘काही माहिती आहे, मग तपासाचा ठोस निष्कर्ष का नाही?’
राजूभाई पंडया यांच्या बेपत्ता प्रकरणानंतर गौशाळा, परिसर आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या हालचाली तपासाच्या कक्षेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गौशाळेशी संबंधित गौरक्षकांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण केवळ नेहमीच्या बेपत्ता प्रकरणापुरते मर्यादित वाटत नाही.
राजूभाईंच्या अनुपस्थितीचा फायदा कोणाला होऊ शकतो? गौशाळा, जमीन आणि त्याच्याशी संबंधित हितसंबंधांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोण करत आहे? असे अनेक प्रश्न गौरक्षकांकडून उपस्थित केले जात आहेत.
‘पोलिसांना माहिती आहे, तरी तपास पुढे का सरकत नाही?’
गौरक्षकांमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा या प्रश्नाचीच आहे. पोलिसांकडे या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती असल्याचा दावा केला जात असताना तपास अद्याप ठोस निष्कर्षापर्यंत का पोहोचलेला नाही, असा त्यांचा सवाल आहे.
‘पोलिसांना बरेच काही माहिती आहे, पण त्यानंतरही तपासाचा वेग का वाढत नाही?’ असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मात्र, पोलिसांकडे नेमकी कोणती माहिती आहे किंवा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
७ महिन्यांपासून ई-लुनाचा शोध नाही; तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या तपासपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारा आणखी एक मुद्दा समोर आला आहे. गौशाळेशी संबंधित केअरटेकर नीरज लक्ष्मण मोहरकर (३४) यांच्या म्हणण्यानुसार, राजूभाईंनी त्यांना कामासाठी सुमारे दीड वर्षापूर्वी १ लाख रुपये किंमतीची ई-लुना घेऊन दिली होती.
२५ मार्च २०२६ रोजी रात्री एमएच-४९-सीएच-५१०६ क्रमांकाची ई-लुना गौशाळेत काम करणारा खानसिंग दुर्गे घेऊन गेला आणि त्यानंतर वाहनासह त्याचा ठावठिकाणा लागला नाही, असा नीरज यांचा दावा आहे.
नीरज यांच्या म्हणण्यानुसार, धर्मेंद्र टांग आणि खानसिंग हे मुन्ना टांग याच्यासाठी जेवण घेण्यासाठी गेले होते. धर्मेंद्र परत येऊन कार्यालयात जात नाही तोच खानसिंग हा ई-लुना घेऊन निघून पसार झाला. त्यानंतर तो परतला नाही. या घटनेची तक्रार लकडगंज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तक्रारीत खानसिंगचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांकही दिल्याचे नीरज यांचे म्हणणे आहे.
मात्र, सुमारे सात महिने उलटूनही ई-लुनाचा शोध लागला नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता राजूभाईंच्या बेपत्ता प्रकरणाच्या तपासाशी या घटनेकडेही जोडून पाहिले जात आहे.
‘ई-लुना सापडत नाही, मग राजूभाईंचा शोध कसा?’
याच मुद्द्यावरून पोलिसांच्या तपासाच्या गतीबाबत सवाल उपस्थित होत आहे. एका प्रकरणात व्यक्तीचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक उपलब्ध असल्याचे सांगितले जात असताना वाहनाचा शोध सात महिन्यांत का लागला नाही? आणि दुसरीकडे राजूभाईंच्या शोधासाठी पोलिसांची पथके आता इतर जिल्हे व राज्यांत रवाना केली जात आहेत—या दोन्ही घटनांमध्ये तपासाची दिशा आणि प्रगती नेमकी काय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गौशाळेची व्यवस्थाही प्रभावित; पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष
राजूभाई पंडया बेपत्ता झाल्यानंतर गौशाळेच्या व्यवस्थेवरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही गोवंशांची प्रकृतीही खालावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता केवळ एका व्यक्तीच्या बेपत्ता होण्यापुरते मर्यादित न राहता गौशाळा, जमीन, संबंधित हितसंबंध आणि स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांशी जोडले जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भंडारा आणि छिंदवाड्याकडे रवाना झालेली पोलिसांची पथके राजूभाईंचा शोध घेण्यात कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















