नागपुरात वाहनचोरांची टोळी जेरबंद! यशोधरानगर पोलिसांचा धडाका

– चार गुन्ह्यांची उकल, २.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
– डीबी पथकाच्या कारवाईने वाहनचोरांचे धाबे दणाणले

The Exposer
नागपूर : नागपूर शहरात वाहनचोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी यशोधरानगर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन संशयित वाहनचोरांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीतून यशोधरानगर, सक्करदरा आणि नंदनवन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या असून, त्यांची एकूण किंमत सुमारे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे सापळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोधरानगर पोलीस ठाण्यात वाहनचोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. याचदरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाला वाहनचोरीच्या गुन्ह्यांबाबत महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. चौकशीदरम्यान इमरान हुसेन राशिद हुसेन आणि शेख सुलतान शेख यासीन या दोघांची नावे समोर आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी शहरातील विविध भागांतून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

तीन पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघड

या कारवाईत यशोधरानगर पोलीस ठाण्यातील एक, सक्करदरा पोलीस ठाण्यातील दोन आणि नंदनवन पोलीस ठाण्यातील एक, अशा एकूण चार वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या दुचाकींमध्ये बजाज कंपनीची पल्सर आणि होंडा कंपनीच्या तीन दुचाकींचा समावेश असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत दोन लाख चव्वेचाळीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वस नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, दक्षिण प्रादेशिक विभागाचे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस चाँद शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निलकंठ नन्नावरे तसेच पोलीस अंमलदार रवी अहिर, लक्ष्मण पडवळ, रितेश दुबे, अमोल भेंडकर, गजानन गोडाम आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

वाहनमालकांना सतर्क राहण्याचे आवाहन

शहरातील वाहनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाहनमालकांनी दुचाकी सुरक्षित ठिकाणी पार्क करावी, हँडल लॉकसोबत अतिरिक्त सुरक्षा लॉकचा वापर करावा आणि वाहन शक्यतो सीसीटीव्हीच्या निगराणीखालील ठिकाणी उभे करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More