– Avira पंचकर्म अँड स्पा येथे सामाजिक सुरक्षा विभाग व AHTU पथकाची संयुक्त कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
The Exposer
नागपूर : पंचकर्म आणि स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली कथितपणे देहव्यापार चालविल्या जात असल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आणि मानवी तस्करीविरोधी पथकाने (AHTU) राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोतवाल नगर परिसरात छापा टाकून तीन पीडित तरुणींची सुटका केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाल नगर येथील कांता पॅलेसमधील फ्लॅट क्रमांक २०० येथे असलेल्या ‘Avira पंचकर्म अँड स्पा’’ या सेंटरवर १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी कारवाई करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विभाग आणि AHTU पथकाने दोन पंच व बोगस ग्राहकाच्या मदतीने ही कारवाई केली.
कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या प्रकरणातील आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी पीडित तरुणींना कमी वेळेत अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून ग्राहक पुरविल्याचा आणि त्यांना कथितपणे वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. या कारवाईत तीन तरुणींची सुटका करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी योगेश अशोकराव इंगोले (वय ३५, रा. गीतानगर, मानेवाडा-बेसा, नागपूर) आणि सुप्रिया राजू रायकवार (वय ३५, रा. भूपेशनगर, बोरगाव, नागपूर) यांच्याविरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १४३(२), १४३(३) तसेच अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा, १९५६ मधील कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आली. सरकारतर्फे पोलीस हवालदार लक्ष्मण चौरे यांनी फिर्याद दिली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.
स्पा सेंटरच्या आडील गैरप्रकारांवर पोलिसांची नजर
या कारवाईमुळे मसाज व पंचकर्म सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्ये होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी केलेल्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणींच्या संदर्भातील पुढील तपासातून या प्रकरणातील अन्य बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















