– सीताबर्डी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. 0610/2026 प्रकरणाला नवे वळण
– बहुजन समाज पार्टी आणि युवा मंच सामाजिक संघटनेची निष्पक्ष तपासाची मागणी,
– राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडूनही पोलिसांना नोटीस
The Exposer
नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. 0610/2026 मध्ये WH NEWS चे संपादक तथा आंबेडकरी चळवळीतील पत्रकार विजय सीताराम खवसे यांचे नाव आरोपी क्रमांक ३ म्हणून नमूद करण्यात आल्याच्या प्रकरणाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. कथित घटनेच्या वेळी आपण नागपुरात उपस्थित नव्हतो, तर रेल्वेने प्रवास करत होतो, असा दावा खवसे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेची निष्पक्ष पडताळणी करण्याची मागणी होत असताना, पत्रकाराला या गुन्ह्यात आरोपी करण्यामागील परिस्थिती काय होती आणि संबंधित पोलिस निरीक्षकांच्या भूमिकेची चौकशी करून कारवाई कधी होणार? असा थेट सवाल नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नागपूर पोलिसांना नोटीस
या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे. आयोगाच्या पत्रात विजय सीताराम खवसे यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीचा संदर्भ देण्यात आला आहे.
तक्रारीची दखल घेऊन आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अंतर्गत प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचे नोटिशीत नमूद आहे. तसेच नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत संबंधित प्रकरणातील कारवाईचा अहवाल सादर करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. या अहवालामध्ये गुन्ह्याचा तपशील, आरोपींची नावे, FIR क्रमांक व कलमे, अटकेची स्थिती, आरोपपत्र किंवा अंतिम अहवालाची माहिती आणि लागू असल्यास पीडिताला देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा तपशील मागविण्यात आला आहे. निर्धारित मुदतीत उत्तर न मिळाल्यास आयोग कायद्यानुसार पुढील कार्यवाही करू शकतो, असेही नोटिशीत नमूद आहे.
घटनेच्या वेळी नागपुरात नसल्याचा पत्रकाराचा दावा
यासंदर्भात पत्रकार खवसे यांनी नागपूर शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, राज्याचे पोलिस महासंचालक व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांना दिलेल्या निवेदनानुसार, FIR मध्ये कथित घटना १५ मे २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान घडल्याचे नमूद आहे. मात्र, त्या काळात आपण वृत्तांकनाच्या कामानिमित्त राज्याबाहेर होतो आणि रेल्वेने प्रवास करत होतो, असा त्यांचा दावा आहे. १४ मे रोजी बोधगया येथून प्रयागराजमार्गे पुढील प्रवास सुरू केला होता. त्यानंतर कटनीमार्गे प्रवास करत १५ मे रोजी सायंकाळी अंदाजे ६ ते ७ वाजताच्या दरम्यान नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रवासादरम्यान रेल्वेच्या जनरल डब्यातून चित्रित केलेला व्हिडिओ आपल्या YouTube चॅनेलवर अपलोड केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. संबंधित व्हिडिओ, स्क्रीनशॉट आणि अन्य उपलब्ध डिजिटल पुरावे तपासून कथित घटनेच्या वेळी आपले नेमके ठिकाण निश्चित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे पुरावे पोलिसांनी स्वतंत्रपणे तपासून त्यांची तारीख, वेळ आणि अन्य तांत्रिक बाबींची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बहुजन समाज पार्टीकडूनही निष्पक्ष चौकशीची मागणी
यासंदर्भात बहुजन समाज पार्टी, नागपूर शहराचे अध्यक्ष अनिकेत कुत्तारमारे यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनात खवसे यांचा संबंधित कथित घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी खवसे यांच्याशी झालेल्या चर्चेच्या आधारे नमूद केले आहे.
खवसे यांचा संबंधित व्यक्तींशी पूर्वीचा संपर्क किंवा भेट संबंध नसल्याचे त्यांच्या म्हणण्यावरून नमूद करत, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी पारदर्शक व वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी पक्षाच्या वतीने कुत्तारमारे यांनी केली आहे. यासह युवा मंच सामाजिक संघटनेनेही या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. या मागण्यांमुळे प्रकरणातील आरोपांची स्वतंत्र पडताळणी करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
प्रश्न केवळ पत्रकाराच्या नावाचा नाही; तपासाच्या विश्वासार्हतेचाही!
एखाद्या गुन्ह्यात व्यक्तीचे नाव आरोपी म्हणून नमूद होणे आणि त्या व्यक्तीचा गुन्ह्यात सहभाग सिद्ध होणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे तपास यंत्रणेने तक्रारदाराचे म्हणणे, संबंधित व्यक्तींचे जबाब, डिजिटल पुरावे आणि घटनाक्रम यांची निष्पक्षपणे पडताळणी करणे आवश्यक आहे.
खवसे यांनी कथित घटनेच्या वेळी आपण घटनास्थळी नसल्याचा दावा केला असेल, तर त्या दाव्याची तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पडताळणी झाली का? तपासात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबली? उपलब्ध पुराव्यांचा विचार करून आरोपी म्हणून नाव नमूद करण्याचा निर्णय घेतला होता का? कायद्यानुसार कुणाला गुन्ह्यात गोवणे ही गंभीर बाब नाही काय? या प्रश्नांची उत्तरे अधिकृत तपासातून स्पष्ट होणे गरजेचे आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना थेट सवाल!
या प्रकरणात आता नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या नोटिशीनंतर पोलिसांनी काय कारवाई केली? अर्जदाराने सादर केलेल्या प्रवासविषयक आणि डिजिटल पुराव्यांची पडताळणी झाली का? आणि तपासातील प्रक्रियेत त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी केली जाणार का?
पत्रकाराच्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी होणार का? संबंधित पोलिस निरीक्षकांच्या भूमिकेची स्वतंत्र पडताळणी करून, दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार का? हे प्रश्न पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून अधिकृत उत्तराची अपेक्षा निर्माण करतात. आता या प्रकरणात पारदर्शक चौकशी, पुराव्यांची निष्पक्ष पडताळणी होऊन करण्यात येणाऱ्या कारवाईकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















