– शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
The Exposer
नागपूर : श्री शास्त्री शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा माजी आमदार अशोक मानकर यांच्या धर्मपत्नी प्रगती अशोकराव मानकर यांचे शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.
प्रगती मानकर या श्री शास्त्री शिक्षण संस्थेच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. त्यांच्या निधनाने मानकर कुटुंबीयांसह त्यांचे नातेवाईक, स्नेही आणि परिचितांमध्ये दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती माजी आमदार अशोक मानकर, मुली अंकिता वैद्य, डॉ. अपेक्षा गोतमारे, अमृता संगावार यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नागपूर येथील मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मेडिकल चौकातील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी कांचन गडकरी, बाबा नंदनपवार, आमदार डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार प्रा. अनिल सोले, आमदार प्रवीण दटके, आमदार कृपाल तुमाने, उदयभास्कर नायर, धनंजय बापट, समीर गौतम, मीरा कडबे, आशीष बडगे, अजय बोढारे, अविनाश ठाकरे, अर्चना डेहनकर, नीलिमा बावणे, जयप्रकाश गुप्ता, सुधीर पारवे, अविनाश खळतकर, संजय निंबाळकर, किशोर कन्हेरे आणि संजय नाथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रगती मानकर यांच्या निधनाने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
Author: संतोष तायडे
संपादक















