डीआरआयचा नागपूरात मोठा ड्रग्जविरोधी प्रहार!

– ५२२ किलोहून अधिक गांजा जप्त; २.६१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक, मौदा टोलवर कारवाई 

The Exposer
नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर प्रादेशिक पथकाने आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत ५२२.५५४ किलो गांजा जप्त केला असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे २.६१ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मौदा जवळील माथनी टोल नाक्यावर ओडिशा-आंध्र प्रदेश सीमेकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणारा टाटा मोटर्सचा १६ टन क्षमतेचा ट्रक अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये अत्यंत हुशारीने तयार करण्यात आलेल्या गुप्त कप्प्यांमधून २४७ पॅकेट्समध्ये भरलेला ५२२ किलोहून अधिक गांजा आढळून आला.
तस्करांनी हा गांजा चालकाच्या सीटमागील गुप्त कप्पा, सीटवरील पोकळी, ट्रकखालील लॉक केलेली टूलबॉक्स तसेच केबिनच्या वरच्या भागात लपवून ठेवला होता. जप्त करण्यात आलेल्या गांजासह ८.५० लाख रुपये किंमतीचा ट्रकही जप्त करण्यात आला आहे.
डीआरआयने ही कारवाई एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत केली असून, तस्करीमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हे रॅकेट ओडिशा-मध्य भारत मार्गे महाराष्ट्रात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय नेटवर्कशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, याच वर्षात डीआरआयने यापूर्वी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये १,२५० किलोहून अधिक गांजा जप्त करून ६.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्या कारवायांमध्ये मुख्य सूत्रधारासह चार जणांना अटक करण्यात आली होती.
डीआरआयच्या या सलग आणि प्रभावी कारवायांमुळे राज्यांच्या सीमांवर कार्यरत अमली पदार्थ तस्करीच्या संघटित जाळ्यांवर मोठा आघात झाला असून, “नशामुक्त भारत” अभियानाला बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More