– गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई; शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
The Exposer
नागपूर : अंबाझरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तलवारी व चाकू बाळगून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला अटक केली. आरोपीकडून तीन तलवारी व एक चाकू असा एकूण ३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (८ जून) सकाळी सुमारे ११.२० वाजताच्या सुमारास अजय नगर कॉर्पोरेशन दवाखान्याजवळ एक युवक हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती अंबाझरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सिद्धांत उर्फ सिंधू शिवनाथ भारद्वाज (वय २१, रा. अजय नगर, कॉर्पोरेशन दवाखान्याजवळ, अंबाझरी, नागपूर) असे आहे.
झडतीदरम्यान आरोपीकडून एक सिल्व्हर रंगाची लोखंडी तलवार, एक जंग लागलेली लोखंडी तलवार, एक काळ्या रंगाची बेसबॉल बॅटसदृश लोखंडी तलवार आणि तीन इंच धार असलेला मेड चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नागपूर शहर पोलिस आयुक्तांनी लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम ४(२५) भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद गोडबोले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेश मांटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश लोही, पोलीस राजू तायडे, प्रवीण लांडे व इतर कर्मचाऱ्यांनी केली.
Author: संतोष तायडे
संपादक











