– वन विभागातील अधिकारी असल्याची बतावणी; टेंडर, नोकरी आणि क्रिकेट संधीच्या नावाखाली गंडा
The Exposer
नागपूर : टेंडर मंजूर करून देणे, शासकीय नोकरी मिळवून देणे तसेच क्रिकेट स्पर्धांमध्ये संधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १९ जणांची ९२ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगद गुलाब खैरे (वय ३९, रा. नांदा फाटा, कोराडी रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विवेक श्याम कांबळे (वय २९, रा. चिंचवड, पुणे) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने हा गैरप्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे.
तक्रारदार अंगद खैरे आणि त्यांचे मित्र बाबुराव यादव हे महान येथील डी. वाय. पाटील क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जात असत. त्यावेळी त्यांची ओळख विवेक कांबळेशी झाली. स्वतःला वन विभागातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत विवेकने विभागातील टेंडर मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. अनेकांना टेंडर मिळवून दिल्याचा दावा करत त्याने अंगद खैरे यांचाही विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीच्या सांगण्यावरून अंगद यांनी ‘दक्षिता इंटरप्रायझेस’ नावाची कंपनी स्थापन करून जीएसटी नोंदणी केली. विवेकने स्वतःची कंपनी वन विभागाची अधिकृत विक्रेता असल्याचे सांगत ‘साई इंटरप्रायझेस’ या कंपनीकडून साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले. त्यानुसार अंगद यांनी आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यात ६ लाख ४४ हजार रुपये जमा केले.
मात्र टेंडर मिळाले नाही आणि आरोपीने टाळाटाळ सुरू केल्याने अंगद यांना संशय आला. त्यांनी स्वतः चौकशी केली असता विवेक कांबळे नावाचा कोणताही अधिकारी वन विभागात कार्यरत नसल्याचे उघड झाले. तसेच साई इंटरप्रायझेसचे संचालक नागेश उत्तेकर यांनीही व्यवहारातील रक्कम अखेरीस विवेकने स्वतःच्या खात्यात वळती केल्याची माहिती दिली.
तपासात आरोपीने केवळ टेंडरच नव्हे, तर नोकऱ्या मिळवून देणे आणि रणजी चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवूनही अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत १९ जणांकडून सुमारे ९२.४४ लाख रुपये उकळल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सोनेगाव पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. फसवणुकीच्या या प्रकरणामुळे व्यावसायिक आणि नोकरीच्या शोधात असलेल्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











