– सुंदरवन गणपती मैदानात स्वच्छता व सौंदर्यीकरण उपक्रम संपन्न
– नागपूर महानगरपालिकेच्या विशेष मोहिमेत नागरिकांचा सक्रिय सहभाग
The Exposer
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे ५ जून ते २१ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या “विशेष स्वच्छता अभियान” अंतर्गत आज सुंदरवन-नरेंद्रनगर परिसरात स्वच्छता व परिसर सौंदर्यीकरणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्त्या सौ. लीना पंकज थोरात यांच्या पुढाकाराने सुंदरवन सोसायटी येथील गणपती मैदान परिसरात हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या अभियानादरम्यान मैदान व परिसरातील कचरा संकलन, स्वच्छता, झाडांच्या परिसराची निगा राखणे तसेच परिसर अधिक स्वच्छ व आकर्षक करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या विशेष प्रसंगी मीनाक्षी शेलेकरी, राबडी देवी चौधरी, वंदना राऊत, नीता नहारकर, स्मिता बहादुरे, सीता मिश्रा, मीना नासरे, शीला भगत, गुलाबराव आदमने, ऊषा देवी वर्मा, आनी महाजन ताई तसेच अनेक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
याशिवाय सुंदरवन कॉलनीतील मोठ्या संख्येने नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांनी स्वच्छता ही केवळ सरकारी यंत्रणांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले. नागपूर महानगरपालिकेच्या या विशेष स्वच्छता अभियानामुळे नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेबाबत सकारात्मक जनजागृती होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
स्वच्छ, सुंदर आणि हरित नागपूर घडविण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
Author: संतोष तायडे
संपादक











