हुडकेश्वर पोलिसांचा करारा दणका! चेन स्नॅचर गँगचा भांडाफोड

– 87 वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावणारा 48 तासांत जेरबंद, तीन गुन्ह्यांची उकल

The Exposer
नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात एका 87 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पसार झालेल्या आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी अवघ्या 48 तासांत अटक करत धक्कादायक गुन्ह्याची उकल केली आहे. या कारवाईत केवळ सदर गुन्हाच नव्हे तर आणखी दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हेही उघडकीस आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवांगी नगर परिसरातील 87 वर्षीय महिला फिर्यादी चंद्रकला नीलकंठराव चिंचूलकर रा. प्लॉट क्र. 181, प्रकाश खाडे यांच्या घरी, शिवांगी नगर, हुडकेशवर या नेहमीप्रमाणे सकाळी घराबाहेर पडल्या असता 6 जून रोजी दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 7 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हुडकेश्वर पोलिसांनी परिसरातील तब्बल 150 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीदारांचे जाळे आणि सततच्या पाठपुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपी सय्यद जबी वल्द जहीर अहमद (वय 32) रा 2 क्रास रोड, व्यंकटपुरम, गुटाहळी, पेल्स आर्ट नगर, उत्तर बेंगलोर, कर्नाटक, हल्ली मु. राऊतनगर, शेख इम्तियाज यांच्या घरी किरायाने, याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार मंजुनाथ व्यंकटा स्वामी रा. कृष्णागीरी, तामिळनाडू, याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आरोपीकडून वृद्ध महिलेची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो होंडा स्प्लेंडर आणि दुसरी बजाज प्लॅटिना दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष म्हणजे, चौकशीत आरोपीने बेलतरोडी आणि वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी दोन चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याने एकूण तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
या कारवाईत एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ क्र. 4) रश्मिता राव, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे (अजनी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे (हुडकेश्वर पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पपीन रामटेके, पोलीस हवालदार गोपाल देशमुख, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, चेतन वैद्य, दिनेश गाडेकर, पोलीस अंमलदार विजय सिन्हा, मंगेश मडावी, प्रज्वल वाणी, गौरव गजभिये, नितेश कडू, विशेष तांत्रिक सहाय्य पोलीस अंमलदार हिमांशू पाटील, अभिषेक पांडे यांनी केली. परिमंडळ क्रमांक 4 च्या पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हुडकेशवर पोलिसांची प्रसंशा केली. तसेच प्रशस्ती पत्र देऊन सर्वांचा गौरव केला, हे विशेष.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More