बिरसा मुंडा चौकात गोळीबाराचा खळबळजनक आरोप!

– मारहाणीच्या प्रकरणाला गंभीर वळण; आता खुनाच्या प्रयत्नासह फायरिंगच्या कलमांची भर, आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध

The Exposer
नागपूर : बिरसा मुंडा पुतळा परिसरात ८ जून रोजी घडलेल्या वाद आणि मारहाणीच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. सुरुवातीला केवळ मारहाणीपुरते मर्यादित मानल्या गेलेल्या या प्रकरणात आता खुनाचा प्रयत्न, गोळीबार आणि जीवे मारण्याची धमकी यांसारख्या गंभीर कलमांची भर करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वाडी पोलिसांनी फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके मैदानात उतरवली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनबानगर येथील प्रदीप हंसराज डोंगरे (३५) यांनी दिलेल्या पूरक जबाबात नमूद केले आहे की, ८ जून रोजी मोक्षधाम मैदानाजवळ झालेल्या वादादरम्यान अब्बास तैय्यब खान, सोनू वासनिक आणि शोएब खान यांनी एका युवकाला मारहाण केली. या घटनेचा जाब विचारण्यासाठी आलेल्या नातेवाईकांशीही धक्काबुक्की व मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ते आणि त्यांचे सहकारी वाद मिटविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, त्याचवेळी परिस्थिती अधिक चिघळली. आरोपानुसार, अब्बास खान याने पांढऱ्या रंगाच्या टाटा सफारी वाहनातून देशी कट्टा काढून त्यांच्यावर गोळीबार केला. प्रसंगावधान राखत डोंगरे यांनी स्वतःचा बचाव केल्याने ते थोडक्यात बचावले. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
वाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी सांगितले की, घटनेनंतर भीती आणि दहशतीमुळे तक्रारदाराने तत्काळ गोळीबाराचा उल्लेख केला नव्हता. मात्र, नंतर दिलेल्या सविस्तर जबाबाच्या आधारे आणि उपलब्ध माहितीच्या अनुषंगाने प्रकरणात खुनाचा प्रयत्न आणि फायरिंगसंदर्भातील गंभीर कलमे वाढविण्यात आली आहेत. पोलिसांनी वाढीव कलमांची माहिती न्यायालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली असून, फरार आरोपींच्या अटकेसाठी डीबी स्कॉडसह विशेष पथके सातत्याने शोधमोहीम आणि छापेमारी करत आहेत. मारहाणीच्या प्रकरणात अचानक गोळीबार आणि खुनाच्या प्रयत्नाच्या कलमांची भर पडल्याने संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आले आहे. आता पोलिस आरोपींपर्यंत कधी पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More