तर्रीच्या वादातून रक्तरंजित शेवट!

– भरतवाड्यात युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; महिला व कुटुंबीयांसह सहा जणांवर गुन्हा?

The Exposer
नागपूर : एका नाश्त्याच्या दुकानात तर्री अंगावर पडल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद अखेर रक्तरंजित हत्येत परिवर्तित झाला. भरतवाडा परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेत योगेश बीरसिंग शाहू (वय २८, रा. भगत नगर) याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश शाहू याचा बांते नावाच्या इसमासोबत नाश्त्याच्या दुकानात तर्री अंगावर पडल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये एका महिलेच्या घरासमोर शाब्दिक बाचाबाची सुरू असताना संबंधित महिलेने “माझ्या घरासमोर वाद घालू नका” अशी समज दिली. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या योगेश शाहूचा त्या महिलेशीही वाद सुरू झाला.

वाद वाढताच महिलेच्या घरातील सदस्य बाहेर आले आणि त्यांनीही शाहूसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. याचदरम्यान महिलेचा भाऊ शुभम पिल्लारे (वय २०, रा. भारतवाडा) घटनास्थळी पोहोचला. संतापाच्या भरात त्याने धारदार शस्त्राने योगेश शाहूवर हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेला शाहू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कळमना पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी शुभम पिल्लारे याच्यासह संबंधित महिला व इतर अशा एकूण सहा जणांना आरोपी केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More