पाली भाषेसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आंबेडकरी चळवळीतील योद्धा डॉ. सुधीर भगत यांचे निधन

The Exposer
नागपूर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, चिंतनशील विचारवंत, अभ्यासू लेखक आणि पाली भाषेला भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून तिला राजमान्यता मिळावी यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे योद्धा डॉ. सुधीर जनार्दन भगत यांचे रविवार, 14 जून 2026 रोजी रात्री 11.30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी, बौद्ध आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

डॉ. भगत यांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखन, प्रबोधनपर विचार आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला वैचारिक बळ देण्याचे कार्य केले. विशेषतः पाली भाषेला घटनात्मक मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध स्तरांवर सातत्याने लढा उभारला. या विषयावरील त्यांचे संशोधन, भूमिका आणि जनजागृतीमुळे ते पाली भाषा चळवळीचे एक प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जात होते.
सामाजिक न्याय, बौद्ध धम्म आणि संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनामूळे चळवळीने एक तत्त्वनिष्ठ, संघर्षशील आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे.

त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा सोमवार, 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या प्लॉट क्र. 17, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी, न्यू मानकापूर, नागपूर या निवासस्थानाहून मानकापूर मोक्षधाम येथे निघणार आहे.
डॉ. सुधीर जनार्दन भगत यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, बौद्ध व आंबेडकरी संघटनांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More