– ८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा एनडीपीएसचे यश
The Exposer
नागपूर : शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई करत ६५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह चार आरोपींना अटक केली. या कारवाईत ड्रग्ज, मोबाईल फोन आणि दोन दुचाकींसह एकूण ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, ड्रग्जचा मुख्य पुरवठादार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये पीयूष मारोतराव मलवंडे (३०), राहुल संजय गोराडे (३६), आर्य श्यामकुमार गोरेले (२३) आणि मनीष सुनील दुर्वे यांचा समावेश आहे. तर प्रतीक किंदरले हा मुख्य पुरवठादार सध्या पोलिसांच्या रडारवर असून फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे एनडीपीएस पथक बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना नरहरी नगर येथील वास्तू रेसिडेन्सीसमोर दोन अॅक्टिव्हा दुचाकींजवळ चार युवक संशयास्पद हालचाली करताना आढळले. पोलिसांनी तत्काळ त्यांची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडून ६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, चार मोबाईल फोन आणि दोन अॅक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आल्या.
प्राथमिक चौकशीत मुख्य आरोपी पीयूष मलवंडे याने फरार आरोपी प्रतीक किंदरले याच्याकडून एमडी ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली. तसेच इतर आरोपी हे अमली पदार्थ खरेदीसाठी त्याच्या संपर्कात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर
तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. पीयूष मलवंडे याच्यावर शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. राहुल गोराडे याच्यावर यापूर्वी एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे. आर्य गोरेले याच्याविरुद्ध मारहाण व शस्त्र कायद्याचे तीन गुन्हे नोंद आहेत, तर मनीष दुर्वे याच्यावर शरीरावरील गुन्हे आणि शस्त्र कायद्यांतर्गत दोन प्रकरणे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी प्रतीक किंदरले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. शहरातील अमली पदार्थांच्या साखळीचा पर्दाफाश करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











