– धडाकेबाज कामगिरी; ४ सराईत आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
The Exposer
नागपूर : शहरातील घरफोडी, वाहनचोरी आणि चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी यशोधरानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८ गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत ४ सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली वाहने, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे दहा ते बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत आरोपींनी यशोधरानगर, अंबाझरी, रणप्रतापनगर, लकडगंज, पाचपावली तसेच नागपूर ग्रामीणमधील रामटेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख मोहिउद्दीन उर्फ रहीम शेख कलीम (23), मोहम्मद कैफ असमुद्दीन अन्सारी (21), नरेंद्र उर्फ बाली चिंतामण चौके (23), निलेश मुरलीधर बाचे (22) यांना अटक केली. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या विविध दुचाकी, स्कूटर, दागिने व रोख रक्कम हस्तगत केली. यामध्ये ४ दुचाकी वाहने, २ स्कूटर, सोन्याचे मणी, अंगठ्या, लॉकेट, कानातील दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींची चौकशी केली असता त्यांनी इतर अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणच्या गुन्ह्यांचा छडा लावून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपायुक्त नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या मोहिमेत पोउनि वैभव नागे, पोहवा राहुल बोन्द्रे, मनिष झरकर, मनोज इरकर, संदीप वानखेडे, शितेश चौरसिया, भूषण येरोजवार, प्रवीण जाधव, प्रवीण बावनकर, सायबर सेलचे आशीष पिंपरहेटे, प्रवीण इनवाते आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Author: संतोष तायडे
संपादक











