हुडकेश्वर पोलिसांनी जबरी चोरीचा केला पर्दाफाश

– आयफोन, दुचाकीसह 1.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : हुडकेश्वर पोलिसांनी अत्यंत तत्परता आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून आयफोन, एक मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास देवतळे हॉस्पिटल परिसरात फिर्यादी आपल्या मित्रांसह घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी त्यांना अडवले. आरोपींनी फिर्यादीला धक्काबुक्की करून मोबाईल हिसकावला आणि धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हर्ष गोविंद बारसागडे (21), रा. प्लॉट नंबर 226, 227, मृगनयनी ले आऊट, हुडकेशवर, असे फिर्यादीचे नाव आहॆ. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक नेटवर्कच्या मदतीने तपास पथकाने आरोपी शिवम प्रविण भनारे (वय 18) रा. फ्लॅट नंबर 201, लिविंयानो बिल्डिंग, दुसरा माळा, नरेंद्रनगर, याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी आरोपीकडून आयफोन (किंमत 50 हजार रुपये), एक सॅमसंग मोबाईल (किंमत 10 हजार रुपये) आणि गुन्ह्यात वापरलेली TVS रोनिन दुचाकी (किंमत 1.20 लाख रुपये) जप्त केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त रश्मिता राव आणि सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिरझापुरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पपीन रामटेके तसेच तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक पंकज जाधव, पोलिस हवालदार गोपाल देशमुख, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, चेतन वेद्य, दिनेश गाडेकर, विजय सिन्हा, पोलिस अंमलदार मंगेश मडावी, प्रज्वल वाणी यांनी या यशस्वी कारवाईत मोलाची भूमिका बजावली. अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा उलगडा करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने हुडकेश्वर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More