– क्राईम ब्रँच युनिट-3 ची धडक कारवाई; 9 आरोपी जेरबंद, 85.98 लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : शहरातील केबल चोरीच्या वाढत्या घटनांवर मोठा आळा घालत गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने दिल्ली व उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोन केबल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
तसेच दोन जुन्या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. युनिट-3 च्या पथकाने पोलीस ठाणे लकडगंज येथील गुन्हा क्र. 346/2026 आणि पोलीस ठाणे गणेशपेठ येथील गुन्हा क्र. 203/2026 या केबल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.
या कारवाईत सरताज शाहिद हुसेन (37), परवेज मुसा खान (27), मोहम्मद राजा मोहम्मद पप्पू (22), अजय जगदीश कुमार (23), राजाबाबू भुरेखान रहीम (25), दिनेश गुमान रजक (20), मिथिलेश रामबहादुर यादव (42), बलराम प्रेमपाल कश्यप (35) आणि आकाश सत्यप्रकाश कुमार (20) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलीस ठाणे सदर येथील गुन्हा क्र. 586/2023 आणि पोलीस ठाणे मानकापूर येथील गुन्हा क्र. 291/2023 या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले.
आरोपींकडून 40 लाख रुपये किंमतीची हायड्रा क्रेन, 30 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो, 15 लाख रुपये किंमतीचे बीएसएनएल कंपनीच्या केबलचे तुकडे तसेच विविध कंपन्यांचे 7 मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण 85 लाख 98 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या उल्लेखनीय कारवाईत सायबर युनिट, गुन्हे शाखेचे विशेष सहकार्य लाभले. नागपूर शहरात सार्वजनिक व सरकारी मालमत्तेची चोरी करणाऱ्या टोळ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत युनिट-3 ला मिळालेले हे महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











