– ऑपरेशन थंडर 2.0 अंतर्गत गुन्हे शाखा युनिट-5 ची धडक कारवाई; 4.48 लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : शहरातील घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या “ऑपरेशन थंडर 2.0” अंतर्गत गुन्हे शाखेच्या युनिट-5 पथकाने मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला गांजा, घातक शस्त्र आणि चोरीच्या मालासह अटक केली. या कारवाईत चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 4 लाख 48 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे युनिट-5 पथक भांडेवाडी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे नागेश्वर नगर मैदान परिसरात संशयास्पदरीत्या दुचाकीवर बसलेल्या एका इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून 992 ग्रॅम गांजा, धारदार लोखंडी कोयता, चोरीचे दागिने आणि मोबाईल आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मो. फैयाज इजाज अन्सारी (वय 24, रा. भांडेवाडी, नागपूर) असे आहे. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने वाठोडा, पारडी आणि भांडेवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 992 ग्रॅम गांजा (किंमत ₹24,900), ऍपल कंपनीचा मोबाईल (किंमत ₹70,000), डीओ मोपेड (किंमत ₹50,000), धारदार लोखंडी कोयता (किंमत ₹1,000), सुमारे 28.50 ग्रॅम सोन्याचे वितळविलेले दागिने (किंमत ₹3 लाख), चांदीचे दागिने (किंमत ₹3,000), असा एकूण ₹4,48,900 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
फरार आरोपींचा शोध सुरु
एनडीपीएस प्रकरणात पंकज साठवणे व ऋषभ (दोघेही रा. हुडकेश्वर) हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच घरफोडी प्रकरणातील नागेश पेंदाम आणि आयुष उर्फ आमला गणवीर हे आरोपीदेखील पोलिसांना हवे आहेत. ही कारवाई ऑपरेशन थंडर 2.0 अंतर्गत पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-5 गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
Author: संतोष तायडे
संपादक











