– पाचपावली पोलिसांची तत्पर कारवाई; अल्पवयीन आरोपी ताब्यात, दोन वाहने जप्त
The Exposer
नागपूर : पाचपावली पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपावली येथील रहिवासी क्रिश राजकुमार हजारे (वय 19) यांनी त्यांची स्प्लेंडर प्लस (MH-49-BQ-3469) ही दुचाकी मेहंदीबाग पुलाजवळ पार्क करून ठेवली होती. काही वेळाने परत आल्यानंतर वाहन जागेवरून चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रणजित माजगावकर व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पाचपावली परिसरातील स्प्लेंडर प्लस चोरीसह तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका दुचाकी चोरीची कबुली दिली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस (किंमत 40 हजार रुपये) तसेच होंडा अॅक्टिव्हा (MH-49-AF-0350, किंमत 25 हजार रुपये) अशी एकूण 65 हजार रुपयांची दोन वाहने जप्त केली. या कारवाईमुळे पाचपावली पोलिस ठाण्याचा गुन्हा क्र. 407/2026 तसेच तहसील पोलिस ठाण्याचा गुन्हा क्र. 310/2026 उघडकीस आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त (उत्तर) विनिता साहू, पोलिस उपायुक्त(परिमंडळ-3) राहुल मदने आणि सहायक पोलिस आयुक्त शिवप्रसाद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विवेक पडघन, पोलिस उपनिरीक्षक रणजित माजगावकर, पोलिस हवालदार रवींद्र राऊत, मुकेश यादव, सुशील रेवतकर तसेच पोलीस शिपाई राजकुमार पाल, युनूस खान आणि अमित ठाकूर यांनी केली.
Author: संतोष तायडे
संपादक











