– लहानग्यांच्या श्रमांवर चालत होता व्यवसाय, प्रशासनाचा करारी दणका
The Exposer
नागपूर : बालकामगार प्रथेच्या विरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत वाडी परिसरातील नीता लॉजिस्टिक या आस्थापनावर धडक कारवाई करत तब्बल १८ बालकामगारांची सुटका केली. महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग, शिक्षण विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बालकामगारमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर पाथकाकडून ही मोहीम राबविण्यात आली. पथकाने नीता लॉजिस्टिकवर छापा टाकला असता, अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
प्राथमिक तपासात सुटका करण्यात आलेल्या मुलांकडून ट्रकवर माल चढविणे व उतरविण्याचे काम करून घेतले जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर सर्व १८ बालकांना तातडीने रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. त्यांच्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण करण्यात आल्या असून, पुढील पुनर्वसन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बालगृहात दाखल करण्यात आले असून, त्यांचे समुपदेशन, शिक्षणाची व्यवस्था आणि कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची कार्यवाही संबंधित विभागांकडून सुरू आहे.
या प्रकरणी संबंधित आस्थापनाविरुद्ध बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ तसेच सुधारित अधिनियम २०१६ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
बालकामगारमुक्त आणि बालस्नेही समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी बालकामगार आढळल्यास तत्काळ प्रशासन किंवा चाईल्ड हेल्पलाइनला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे आणि सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, शिक्षण विभागाचे प्रसेनजीत गायकवाड, कामगार विभागाच्या गायत्री दुबे व अविनाश डोके, पोलीस उपनिरीक्षक उत्तम जायभाये, हवालदार कमलेश ठाकरे, पोलीस अंमलदार मारुती मेश्राम, चाईल्ड हेल्पलाइनचे अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे, मंगला टेंभुर्णे तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या शाहीना शेख, रूपाली वानखेडे आणि अश्विनी चौरे यांनी सहभाग घेतला.
Author: संतोष तायडे
संपादक











