25 लाखांच्या खंडणीच्या तक्रारीतील आरोपांची पोलखोल; रेल्वे तिकिटांनी उघड केला ‘खोट्या आरोपांचा’ खेळ?

– मी नागपूरातच नव्हतो—माझ्याविरुद्धची तक्रार खोटी, कटकारस्थानाचा भाग
– रेल्वे तिकिटे, विवाह समारंभाचे फोटो, आणि RTI कागदपत्रांसह अनिल सहारे यांचा पलटवार

The Exposer
नागपूर : बिनाकी ले-आऊटमधील वादग्रस्त प्लॉट क्रमांक 639 प्रकरणात 25 लाख रुपयांची खंडणीसह जीवे मारण्याची धमकी प्रकरणी गुन्हे शाखेकडे करण्यात आलेल्या तक्रार प्रकरणी नवे वळण आले आहॆ. या प्रकरणातील गैरअर्जदार अनिल ताराकांत सहारे यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार करणाऱ्याविरुद्धच यशोधरा नगर पोलिसांकडे तक्रार केली आहॆ. या प्रकरणी सहारे यांनी नुकतेच आपले बयान ही नोंदविले आहॆ. त्यांनी सादर केलेल्या लेखी बयानातून मूळ तक्रारीतील अनेक आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आपल्याविरोधातील 25 लाखाची खंडणीची मागणी तथा जीवे मारण्याची धमकी दिल्याची केलेली तक्रार ही खोटी आणि कटकारस्थानातून रचलेली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मनिष हिरालाल सुगंध व इतर अशी अनिल सहारे यांच्या विरुद्ध 25 लाखांची खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याची गुन्हे शाखेकडे तक्रार करणाऱ्यांची नावे आहॆ. या विरुद्ध सहारे यांनी यशोधरा नगर पोलिसांना दिलेल्या तक्रार व लेखी बयानात, ज्या कालावधीत कथित घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे, त्या काळात आपण नागपूरमध्ये नसून मुंबईत कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचे नमूद केले आहे. यासाठी त्यांनी विवाहपत्रिका, समारंभातील रंगीत छायाचित्रे, रेल्वे आरक्षण तिकिटे तसेच माहिती अधिकारांतर्गत प्राप्त रेल्वे प्रवासाच्या अधिकृत नोंदी यशोधरानगर पोलिसांकडे सादर केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, 20 नोव्हेंबर 2025 रोजी नागपूरहून मुंबईला आणि 26 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईहून नागपूरला रेल्वे प्रवास केल्याचे पुरावे पोलिसांकडे जमा करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.

त्यामुळे कथित खंडणी आणि धमकीच्या आरोपांच्या वेळेस आपण घटनास्थळी उपस्थितच नसल्याचा दावा सहारे यांनी केला आहे. याशिवाय, खोटी पोलिस तक्रार करून 25 लाखांच्या खंडणीचा आरोप लावण्यात आला आहॆ. या खोट्या तक्रारीवरून मानसिक व सामाजिक छळ करण्यासाठी संगनमताने गंभीर कट रचण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सादर केलेल्या कागदपत्रांची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सहारे यांनी यशोधरानगर पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणामुळे बिनाकी ले-आऊटमधील वादग्रस्त भूखंडाचा वाद पुन्हा ऐरणीवर आला असून, आता यशोधरा नगर पोलिस चौकशीतून नेमके सत्य काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More