८५ वर्षीय महिलेकडील घरफोडीचा छडा; पाचपावली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

– दोन विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; दोन गुन्हे उघडकीस, १.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत दोन गुन्ह्यांची यशस्वी उकल केली असून, त्यांच्याकडून १ लाख ५७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करीबाग परिसरातील ८५ वर्षीय कौशल्याबाई गणेर यांच्या राहत्या घरी १२ जून रोजी रात्रीला दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील ५० हजार रुपये रोख रक्कम व १.५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली सुजुकी ऍक्सेस दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच नागपूर ग्रामीणमधील वाहन चोरीच्या आणखी एका गुन्ह्याची उकल करण्यात येऊन दुसरे चोरीचे वाहनही हस्तगत करण्यात आले. या कारवाईत एकूण १,५७,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता साहू, पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विवेक पडधान, पोउपनि रंजीत माजगावकर, पोहवा दिलीप पवार, प्रकाश पखान, वासुदेव जयपुरकर, अंकुश राठोड, पोशि आशिष बावनकर, पोशि अतुल फरताडे आणि पद्माकर उके, पोशि महेंद्र सेलोकर यांचा विशेष सहभाग होता.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More