– दोन गुन्ह्यांची उकल; चोरीची दुचाकी, 14 मोबाईल व रोख रकमेसह ₹1.55 लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : सिताबर्डी पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे एका लुटीच्या आरोपीला अटक करून दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे. आरोपीकडून चोरीची दुचाकी, 14 मोबाईल फोन, रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल असा एकूण ₹1 लाख 55 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाऊलाल प्रितिलाल भगत (वय 62) हे 8 जून रोजी रात्री सुमारे 10 वाजता महाविद्यालयाजवळ उभे राहून सिगारेट पीत असताना आरोपीने त्यांना धमकावून त्यांच्याकडील रेडमी कंपनीचा मोबाईल फोन व रोख 4 हजार रुपये हिसकावून नेले होते. याप्रकरणी सिताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी आर्यन भगवान नंदेश्वर (वय 19, रा. वानाडोंगरी, नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याने अंबाझरी हद्दीतून एक बर्गमन दुचाकी चोरी करून ती गुन्ह्यांमध्ये वापरल्याचेही उघड झाले.
पोलिसांनी आरोपीकडून एक बर्गमन दुचाकी, विविध कंपन्यांचे 4 मोबाईल फोन, रेडमी कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली. या कारवाईमुळे सिताबर्डी व अंबाझरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता साहू, पोलीस उपायुक्त अनुपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास रावत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनीष कोल्हटकर तसेच पोउपनि विनोद तिवारी, शाम वारंगे, नंदकिशोर वाल्दे, उमेश कसलीकर, शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर, चेतन शेंडे व नैनीश तलवारे यांच्या पथकाने केली.
Author: संतोष तायडे
संपादक











