– ३४ वर्षांच्या धडाडीच्या शोधपत्रकारितेचा सन्मान
The Exposer
नागपूर : सत्याचा ध्यास, निर्भीड लेखणी आणि जनहितासाठी सातत्याने केलेली शोधपत्रकारिता यामुळे राज्यभर वेगळी ओळख निर्माण करणारे दैनिक लोकमतचे उप मुख्य-उप-संपादक नरेश गणपतराव डोंगरे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ जाहीर झाला आहे.
गेल्या तब्बल ३४ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या नरेश डोंगरे यांनी आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आणि जनहिताच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. वस्तुनिष्ठ, अभ्यासपूर्ण आणि धाडसी पत्रकारितेमुळे त्यांनी विदर्भासह राज्यभरात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
देशभर गाजलेल्या अनेक शोधपत्रकारितेच्या मोहिमांमध्ये त्यांचे योगदान विशेष ठरले आहे. पाकिस्तानी हेर निशांत अग्रवाल प्रकरणाचा भंडाफोड, याकूब मेमन फाशी प्रकरणावरील वृत्तमालिका तसेच गोव्यातील कॅसिनोवरील स्टिंग ऑपरेशन या त्यांच्या गाजलेल्या पत्रकारितेच्या कामगिरी मानल्या जातात. या धडाकेबाज वृत्तांकनामुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांची दखल घेतली गेली आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा नागपूर, मुंबई, पुणे, सोलापूरसह विविध ठिकाणी तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याची दखल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकार संघटनांनीही वेळोवेळी घेतली आहे.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान, नागपूर आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानाची दखल घेणारा मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ कवी, विचारवंत आणि पत्रकार स्व. अनिलकुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो.
नरेश डोंगरे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार गिरीधर देशमुख आणि मोहन अटाळकर यांचीही यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख २१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे असून १३ सप्टेंबर २०२६ रोजी स्व. अनिलकुमार यांच्या स्मृतिदिनी आयोजित विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. निष्ठा, धैर्य, अभ्यासू वृत्ती आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा सुरेख संगम असलेल्या नरेश डोंगरे यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











