दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदी विलास गजघाटे; विश्वस्तांच्या सभेत एकमताने निवड

– दीक्षाभूमीच्या विकासाला नवी दिशा; पारदर्शक आणि कायदेशीर प्रशासनाची ग्वाही

The Exposer
नागपूर : परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, नागपूरच्या विश्वस्तांची महत्त्वपूर्ण सभा सोमवारी पार पडली. या सभेत समितीच्या अध्यक्षपदी विलास गजघाटे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपस्थित विश्वस्तांनी समितीचे कामकाज संस्थेच्या घटनेनुसार, पारदर्शकपणे आणि कायद्याच्या चौकटीत राहून चालविण्याचा निर्धार व्यक्त केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. डॉ राजेंद्र गवई, नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे, नागपूर शहर कार्याध्यक्ष क्षितिज गायकवाड, नागपूर शहर महासचिव रजत महेशगवळी,

उपायुक्त धर्मदाय, नागपूर यांनी दिलेल्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत संस्थेच्या प्रशासकीय, कायदेशीर व वैधानिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच धर्मदाय प्राधिकरणाने दिलेल्या सर्व आदेश व निर्देशांचे पालन करण्याबाबत विश्वस्तांनी बांधिलकी दर्शविली. सभेच्या सुरुवातीला कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी डॉ. प्रदीप आगलावे यांची सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बैठकीस डॉ. कमलाताई गवई, डॉ. राजेंद्र गवई, एन. आर. सुटे, डॉ. डी. बी. दाभाडे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विलास गजघाटे, भंते नागदीपंकर आदी विश्वस्त उपस्थित होते.

यानंतर संस्थेच्या नेतृत्वाबाबत चर्चा झाल्यानंतर नवीन अध्यक्षपदासाठी विविध नावांचा विचार करण्यात आला. अखेर उपस्थित सर्व विश्वस्तांनी विलास गजघाटे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास सहमती दर्शविल्यानंतर त्यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

सभेत दीक्षाभूमीची प्रतिष्ठा, पावित्र्य आणि ऐतिहासिक वारसा अबाधित राखण्यासोबतच विकासकामांना गती देणे, प्रशासन अधिक उत्तरदायी व पारदर्शक करणे आणि संस्थेचे कामकाज कायद्याच्या चौकटीत चालविणे यावर विशेष भर देण्यात आला. विश्वस्तांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

तसेच आवश्यक सर्व वैधानिक प्रक्रिया आणि प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार पूर्ण करण्याचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला. दीक्षाभूमीसारख्या जागतिक स्तरावरील प्रेरणास्थानाच्या व्यवस्थापनात स्थैर्य, पारदर्शकता आणि विकासाला प्राधान्य देण्याचा संदेश या निवडीमुळे अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया आंबेडकरी समाजातील विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More