– सुपारी व्यापाऱ्यावर नाट्यमय धाड; खोटी कारवाईची धमकी देत खंडणीचा प्रयत्न? चौघांवर गुन्हा दाखल
The Exposer
नागपूर : पोलिस असल्याची बतावणी करून एका सुपारी व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये घुसून व्हिडिओ शूटिंग करणे, अश्लील शिवीगाळ करणे तसेच जीव मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कळमना पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दीपक गुरुमुखदास दर्यानी (वय ५०), रा. साईनगर, नेताजीनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. दर्यानी यांचे त्रिशक्ती ट्रेडिंग कंपनी नावाचे गोडाऊन आदिवासी लेआऊट परिसरात असून, २३ जून रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास चार जण त्यांच्या गोडाऊनमध्ये घुसले.
या चौघांनी स्वतःला लोकसेवक व पोलिस अधिकारी असल्याचे भासवत मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. तसेच, “तुम्ही खराब सुपारी विकता, तुमच्याविरुद्ध फूड अँड ड्रग्स विभाग व पोलिसांकडे तक्रार करतो,” असे सांगून दबाव टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यावर दर्यानी यांनी स्वतः पोलिसांत तक्रार करण्याचे सांगितल्याने आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर तक्रारदार कळमना पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता आरोपी तेथेही पोहोचले. पोलिस ठाण्याच्या परिसरातच “माझ्याविरुद्ध कारवाईची तक्रार दिली तर गोळी घालून उडवून टाकू,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी गौरव हरिप्रसाद पांडे (३१), सचिन सुरेशसिंग बैस (४२), नरेंद्र लल्लुजी चौबे (५७) आणि जितेंद्र अशोककुमार कुदवाणी (४२) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २०४, ३२९, २९६, ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार गिराम करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Author: संतोष तायडे
संपादक











