गुमथी गावात घाणीचा विळखा; आरोग्य विभागाची गंभीर दखल

– जनावरांचे शेण व सेंद्रिय कचऱ्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीला सात दिवसांत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश

The Exposer
नागपूर : कामठी तालुक्यातील गुमथी गावात जनावरांचे शेण आणि सेंद्रिय कचऱ्याची अयोग्य साठवणूक करून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र, गुमथी यांनी गंभीर दखल घेत ग्रामपंचायतीला तातडीने प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

गावातील एका नागरिकाने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान मोठ्या प्रमाणात जनावरांचे शेण व सेंद्रिय कचरा निवासी भागाजवळ साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून माशा, डास आणि इतर रोगवाहक कीटकांची वाढ झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

आरोग्य विभागाने आपल्या पत्रात नमूद केले आहे की, या अस्वच्छतेमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता असून संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानण्यात आला आहे.

याप्रकरणी संबंधित व्यक्तींना नोटीस बजावून तात्काळ शेण व कचरा हटविणे, परिसराची स्वच्छता राखणे तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत. याशिवाय करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सात दिवसांच्या आत प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, कामठी तालुक्यातील गुमथी गावातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन या प्रकरणात कितपत कठोर कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More