दुचाकी चोरट्याला नंदनवन पोलिसांची बेडी

– १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, १३ चोरीच्या गाड्या हस्तगत

The Exposer
नागपूर : नंदनवन पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणाचा छडा लावत एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल १३ चोरीच्या दुचाकींसह सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनबाग परिसरातील रहिवासी फिर्यादी यांच्या बजाज पल्सर मोटारसायकलची अज्ञात चोरट्याने डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने चोरी केली होती. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत राठोड व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अजनी परिसरातून संशयित विवेक दुर्गेश दहाटे (वय २६) याला ताब्यात घेत चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने अखेर वाहन चोरीची कबुली दिली.

तपासादरम्यान आरोपीकडून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी करण्यात आलेल्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या. यात होंडा अ‍ॅक्टिव्हा, हिरो स्प्लेंडर, बजाज पल्सर आदी वाहनांचा समावेश असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मिता राव व सहाय्यक पोलीस आयुक्त रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत राठोड, पोलीस हवालदार विश्वजीत उके, योगेश उके व पोलीस शिपाई राकेश हिंगणकर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More