-१० लाखांच्या मदतीनंतर वाद निवळला
The Exposer
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वायुसेना नगर परिसरात इमारतीवर रंगकाम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. उमेश महादेवराव धुर्वे (वय ५०) असे मृत मजुराचे नाव आहे.
घटनेनंतर कंत्राटदाराने जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी वायुसेना अनुरक्षण कमांड मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मृतदेह ठेवून आंदोलन केले. अखेर कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नेमके काय घडले?
मंगळवारी दुपारच्या सुमारास उमेश धुर्वे हे नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वायुसेना नगर येथील एका इमारतीवर रंगकाम करत होते. तिसऱ्या मजल्यावर काम सुरू असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हजारी पहाड परिसरातील त्यांच्या घरी शोककळा पसरली. पत्नी आणि तीन मुलांचा आधार हरपल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले.
सुरक्षेच्या दुर्लक्षाचा आरोप
बुधवारी शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेऊन वायुसेना अनुरक्षण कमांड मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले. उमेश धुर्वे ज्या कंत्राटदार दिलजीतसिंग भाटिया यांच्या अधिपत्याखाली काम करत होते, त्यांनी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साधने व संरक्षणाची व्यवस्था केली नव्हती, असा आरोप कुटुंबीयांनी केला. अपघातानंतरही जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न झाल्याने संताप अधिक वाढल्याचे त्यांनी सांगितले.
माजी नगरसेवकांचा पाठिंबा
या आंदोलनात माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांनीही सहभागी होत कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य तसेच सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ न दिल्याचा आरोप केला.
१० लाखांच्या मदतीनंतर आंदोलन मागे
परिस्थिती तणावपूर्ण होताच गिट्टीखदान पोलिसांसह संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चर्चेनंतर कंत्राटदाराला घटनास्थळी बोलावण्यात आले. मृताच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य करण्यात आले. त्यापैकी ५ लाख रुपयांचा धनादेश तात्काळ देण्यात आला, तर उर्वरित ५ लाख रुपये नंतर देण्याचे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलन शांत झाले. मात्र, कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावल्याची वेदना आणि तीन मुलांच्या डोक्यावरून उठलेले वडिलांचे छत्र कोणत्याही आर्थिक मदतीने भरून निघणार नसल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Author: संतोष तायडे
संपादक











