पोलिसांना चकमा देणारा अट्टल घरफोड्या अखेर गजाआड!

– तीन गुन्ह्यांची उकल; १०.७० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त – आणखी तीन साथीदार फरार
– यशोधरानगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या जोरावर आरोपीला बेड्या

The Exposer
नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी तब्बल वर्षभर पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार राहिलेल्या अट्टल घरफोड्याला अखेर बेड्या ठोकत तीन घरफोडीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १० लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, या टोळीतील आणखी तीन साथीदार अद्याप फरार असल्याने त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

अटक करण्यात आलेला मुबारक वकील बाबू शहा (वय २१, रा. कुंदनलाल गुप्ता नगर, यशोधरानगर, नागपूर) हा गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि अचूक नियोजनाच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सखोल चौकशीदरम्यान आरोपीने शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले १० लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. यात सोन्याच्या अंगठ्या, चेन, लॉकेटसह इतर मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे.

तपासादरम्यान आरोपी हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून, या टोळीतील निकेश बलराम शाहू (२२), नरेंद्र उर्फ बाली चिंतामन बोकडे (२३) आणि सलमान इकबाल खान (३०) हे तीन साथीदार अद्याप फरार असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई परिमंडळ क्र. ५ चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा इशा आणि कळमना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस उपनिरीक्षक वैभव नागे, पोलीस हवालदार राहुल बोन्द्रे, पोलीस अंमलदार मनिष झरकर, संदीप वानखेडे, शितेश चौरशिया, भूषण यरोजवार, प्रवीण बावणकर तसेच परिमंडळ-५ सायबर सेलचे आशिष पिपरहेटे आणि प्रवीण इवनाते यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More